गडहिंग्लज विभागात उच्चांकी दर देणार : भरत कुंडल
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ओलम (हेमरस) ता. चंदगडचे सन् 21-22 सालाच्या गळीत हंगामासाठी रोलर पूजन ओलम कारखान्याचे प्रोसेस हेड शशांक शेखर यांच्या हस्ते तर बिझनेस हेड भरत कुंडल, मुख्य शेती अधिकारी सुधिर पाटील, टेक्नीकल हेड संजय टोमर, एच. आर. हेड अझीझ झंझानी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये पाऊस झाल्यामुळे भागात ऊस पिकाची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे यावर्षी वाढीव ऊस पिकाचे उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच ऊस तोडणीसाठी लागणारी तोडणी वाहतूक यंत्रणा करार करून घेण्यात आले आहेत. येणारा गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालू करण्यात येणार असून कारखान्यातील दुरुस्तीची कामे चालू आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ओलम (हेमरस) गडहिंग्लज विभागात ऊस दर उचांकी देणार आहे. आजपर्यंत ओलम (हेमरस)ने वेळोवेळी ऊस आणि तोडणी वाहतूकदार यांची बिले देऊन भागात विश्वास संपादन केला आहे. यावर्षी शेती विभागाकडे 24662 ऊस उत्पादक शेतकर्यांची 13258 हेक्टर ऊसाची नोंद ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे, असे मनोगत यावेळी बोलताना बिझनेस हेड भरत कुंडल यांनी व्यक्त केले.
यावेळी युनियन अध्यक्ष संताराम गुरव, युनियन सेक्रेटरी रवळनाथ देवाण, अनिल पाटील यांच्यासह कारखान्यातील पदाधिकारी, कामगार शेती विभागातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.