शिक्षणमंत्री उदय सामंत : देवचंद महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे उद्घाटन
निपाणी : कर्नाटकातील मराठी भाषिक जनतेवर अन्याय होत आला आहे. त्याबाबत शासन नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमाभागाबाबत असलेला विवादित शब्द महाराष्ट्र शासनाने वगळला आहे. बेळगावजवळील शिनोळी गावात महाराष्ट्र शासनाकडून कौशल्यावर आधारित महाविद्यालयाची लवकरच स्थापना होणार आहे. त्याशिवाय सीमाभागात असलेल्या देवचंद महाविद्यालयासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सीमाभागातील 865 गावावर महाराष्ट्र शासनाचा हक्क असून ही गावे लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट केली जाणार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. अर्जुननगर( ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात गुरुवारी (ता.14) सायंकाळी आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री उदय सामंत बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवर यांच्या उपस्थितीत मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बहुउद्देशीय व्यायाम शाळा आणि संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. त्यानंतर दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला.
मंत्री उदय सामंत म्हणाले, देवचंद महाविद्यालयाने सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या भागातील कष्टकरी सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. त्यांना अत्याधुनिक सुविधासह शिक्षण देण्याचे काम निरंतरपणे सुरु ठेवले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील मराठी भाषिक सर्वच गावे महाराष्ट्रात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या संस्कारमय शिक्षण देण्याची गरज असून त्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रातील महाआघाडीचे सीमाभागावर नेहमीच लक्ष असून यापुढील काळातही सीमाभागातील महाविद्यालयांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह म्हणाले, पद्मभूषण देवचंदजी शहा, आणि किरणभाई शाह यांच्या सीमावासियांचे शैक्षणिक स्वप्नाची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. संस्थेच्या माध्यमातून सीमा भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत कमी दरात विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचा लाभ हजारो विद्यार्थी घेत आहेत. सीमाभागातील या महाविद्यालयात विविध प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी या पुढील काळातही महाराष्ट्रातले शिक्षण मंत्र्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.
कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे, जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ.तृप्तीभाभी शाह, प्रतिभाभाभी शाह, प्रकाश शहा, संचालक प्रदीप मोकाशी, प्रसन्नकुमार गुजर, सुबोधभाई शाह, प्रभारी प्राचार्य पी. पी. शाह, प्रवीणभाई शाह, प्रा. नानासाहेब जामदार, प्रा. अशोक डोनर, प्रा. डॉ. राहुल घटेकरी, प्रा. राजकुमार कुंभार, प्रा. आर. के. दिवाकर, रमेश देसाई यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सभासद प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त निपाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रम
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेजसमोरील चर्चमध्ये बुधवारी (ता. …