बेळगाव (वार्ता) : ग्रामीण भागात सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. संपूर्ण देशात उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यात कर्नाटक राज्य अग्रस्थानी आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. अंकली या गावात नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अंकली या गावात नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांच्याहस्ते झाले.
यावेळी बोलताना डॉ. के. सुधाकर म्हणाले, जिल्ह्यात 35 लाख जनतेपैकी 98 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 70 टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोविड काळात आणि लसीकरण मोहिमेत आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि मुख्यमंत्री बोम्माई यांनी विशेष स्वारस्य दाखवून कोरोनामुक्त करण्याचे वचन दिले आहे, अशी माहिती डॉ. के. सुधाकर यांनी दिली.
यावेळी डॉ. के. सुधाकर यांनी गेल्या 15 महिन्यातील कोविड परिस्थितीचा तसेच आगामी कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, अंकली गावात आरोग्य केंद्र सुरू करण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली होती. यानुसार हायटेक पद्धतीने आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली असून या भागातील जनतेने याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी खासदार प्रकाश हुक्केरी यावेळी बोलताना म्हणाले, प्रभाकर कोरे आणि माझ्या प्रयत्नामुळे या आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. शिरगाव आणि कोथळी या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, डीएचओ कार्यालयातून मंजुरी मिळवावी यासाठी 4 एकर जमीन देण्यात आली आहे. 2.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गणेश हुक्केरी होते. यावेळी बोलताना त्यांनी प्रकाश हुक्केरी आणि डॉ. प्रभाकर कोरे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच कोरे आणि हुक्केरी कुटुंबियांकडून घेतलेल्या मेहनतीचे कौतुकही केले.
यावेळी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, चिक्कोडी जिल्हा भाजप अध्यक्ष राजेश नेरली, अंकली ग्रामपंचायत अध्यक्ष शैलजा सुरेश पाटील, आरोग्य विभाग संचालक डॉ. अप्पासाहेब नरट्टी, डीएचओ डॉ. एस. व्ही. मुन्याळ, एडीएचओ डॉ. एस. एस. गडाद आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
मराठी विद्यानिकेतन स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल
Spread the love बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे स्नेहसंमेलन 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी …