पोर्ट ऑफ स्पेन : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शानदार असा विजय मिळवला आहे. यावेळी वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावांच्या तगड्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने दोन गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण अक्षरने मोक्याच्या क्षणी ठोकलेल्या अर्धशतकाने सर्वांचीच मनं जिंकली. अक्षरने नाबाद 64 धावा ठोकत षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार पूरनचा हा निर्णय अगदी योग्य ठरला असून विंडीजनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच कसरत घेतली. त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी कायम ठेवली. सलामीवीर शाय होप आणि कायल मायर्स यांनी दमदार अशी अर्धशतकी भागिदारी केली. 39 धावा करुन मायर्स बाद झाल्यावर एस. ब्रुक्सने देखील 35 धावा ठोकत होपला साथ दिली. ज्यानंतर ब्रँडन किंग शून्यावर बाद झाला. पण कर्णधार पूरनने होपसोबत एक बलाढ्य भागिदारी उभारली. पूरन 74 धावा ठोकून तंबूत परतला. पण होपने फटकेबाजी सुरु ठेवली. 115 धावा करुन तो बाद झाला. पण तोवर विंडीजची धावसंख्या 300 पार गेली होती. ज्यामुळे भारताला विजयासाठी 312 धावा करायच्या होत्या. भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक 3 तर हुडा, अक्षर आणि चहल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
भारताचा शानदार विजय
तब्बल 312 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताला काही वेळातच मोठा झटका बसला. कर्णधार शिखर 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर गिल आणि अय्यरने डाव सावरला खरा पण 43 धावा करुन गिलही बाद झाला. मग सूर्यकुमार (9) स्वस्तात माघारी परतल्यानंतर मात्र संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. 63 धावा करुन अय्यर बाद झाला खरा पण संजूने झुंज कायम ठेवली. पण 54 धावा करुन तोही बाद झाला. भारताची स्थिती अत्यंत बिकट झाली असताना दीपक हुडाने अक्षर पटेलसोबत मोर्चा सांभाळला. दोघांनी फटकेबाजी सुरु केली. पण तितक्यात 33 धावा करुन हुडा बाद झाला. अक्षरच्या खांद्यावर सर्व सामना येऊन ठेपला. त्याच वेळी त्याने अगदी अप्रतिम कामगिरी करत संयमी अर्धशतक ठोकलं. कारकिर्दीतील पहिलं वहिलं एकदिवसीय अर्धशतक ठोकत त्याने सामना भारताला जिंकवून दिला. 35 चेंडूत 3 चौकार तर 5 षटकार ठोकत अक्षरने नाबाद 64 धावा केल्या. यावेळी अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत अक्षरने विजय पक्का केला. या दमदार कामगिरीमुळे अक्षरलाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
मालिकाही भारताच्या खिशात
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 3 धावांनी विजयी झाला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली होती. ज्यानंतर आता दुसरा एकदिवसीय सामनाही भारताने दोन गडी राखून जिंकला आहे. ज्यामुळे भारताने मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.