Saturday , September 21 2024
Breaking News

विस्तारित कार्यकारिणीमध्ये तरुणांना समाविष्ट करून संघटना बळकट करण्याचा निर्धार!

Spread the love

 

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारक येथे दिनांक 30 जुलै रोजी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सद्यस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समिती समोर अनेक आव्हाने आहेत. संघटना बळकट करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष व समिती पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागणे गरजेचे आहे, अशी मते कार्यकर्त्यांनी यावेळी मांडली. यासाठी तालुक्यातील राष्ट्रीय पक्षाच्या आमिषाला बळी पडलेल्या मराठी भाषिक जनतेला समितीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण तालुक्यात विभागवार बैठक घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नवतरुणांना कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करून घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच खानापूर तालुक्यातील 60 शिक्षकांची बदली झाली असून अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव आणून या 60 शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत राष्ट्रीय महामार्गात जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसात नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे त्याची पूर्तता करून घेणे, अंगणवाडी भरती प्रक्रिया तृतीय भाषा कन्नड म्हणून शिकलेल्या मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणे या विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. महादेव घाडी म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीला अधिक बळकटी देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे केवळ नाममात्र बैठका न घेता विभागवार बैठक घेऊन जनतेत जनजागृती केली पाहिजे. तालुक्यातील सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रयत्न केले पाहिजे, असे यावेळी ते म्हणाले. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. कार्यकारिणी निवड करत असताना तालुक्यातील निष्ठावंत तरुणांना विस्तारित कार्यकारिणीमध्ये स्थान द्यावे व पुन्हा एकदा संघटना बळकट करावी, असे विचार उपस्थितांनी मांडले.

यावेळी बोलताना कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करूनच विस्तारित कमिटीमध्ये निष्ठावंतांना स्थान देण्यात येईल.

अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले की, कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांचे स्वागत करून आगामी काळात संघटना बळकटीसाठी योग्य ती विस्तारित कमिटी व कार्यकारिणी करण्यात येईल. ज्येष्ठांना व तरुणांना विस्तारित कमिटीमध्ये समाविष्ट करून संघटनेचे काम अधिक बळकट करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करूया. यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे असल्याचे विचार यावेळी मांडले.

यावेळी व्यासपीठावर सीमासत्याग्रही शंकरराव पाटील, उपाध्यक्ष जयराम देसाई, रमेश धबाले, रणजित पाटील, कृष्णा कुंभार, पांडुरंग सावंत, मारुती गुरव, कोषाध्यक्ष संजीव पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव, राष्ट्रपती पदक प्राप्त आदर्श शिक्षक व निवृत्त मुख्याध्यापक आबासाहेब दळवी यांचा रविवारी 69 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार तसेच शाल, श्रीफळ देऊन त्यांचा संघटनेच्या वतीने व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.
शेवटी उपाध्यक्ष रमेश धबाले यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाच्या श्रावणी पाटील हिची निवड

Spread the love    खानापूर : जांबोटी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी भरणानी पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *