दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने आयर्लंडवर 33 धावांनी विजय मिळवला. 186 धावांचा बचाव करताना भारताने आयर्लंडला 152 धावंत रोखले. आयर्लंडकडून एंड्रयू बालबर्नी याने एकाकी झुंज दिली. एंड्रयू बालबर्नी याने 72 धावांची खेळी केली. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. या विजयासह भारताने तीन सामन्याची मालिका 2-0 ने खिशात घातली. मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी होणार आहे.
भारताने दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार पॉल स्टर्लिंग स्वस्तात माघारी परतला. पण दुसरा सलामी फलंदाज एंड्रयू बालबर्नी याने एकाकी झुंज दिली. एकीकडे विकेट पडत असताना बालबर्नी याने दुसऱ्या बाजूने धावांचा पाऊस पाडला. एंड्रयू बालबर्नी याने 72 धावांची खेळी केली. बालबर्नी याने 51 चेंडूत चार षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने धावांचा पाऊस पाडला.
एंड्रयू बालबर्नी याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. बालबर्नी याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला तीस धावांचा पल्ला पार करता आला नाही. पॉल स्टर्लिंग आणि एल ट्युकर यांना खातेही उघडता आले नाही. ए ट्युकर सात धावा काढून बाद झाला.
भारताकडून जसप्रीत बुमराह याने चार षटकात फक्त 15 धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. बुमराहने एक षटक निर्धावही फेकले. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. अर्शदीप सिंह याने एक विकेट घेतली.
ऋतुराजचे अर्धशतक, रिंकू सिंहचा फिनिशिंग टच, भारताची 185 धावांपर्यंत मजल
ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक आणि शिवम-रिंकूचा फिनिशिंग टचच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात 185 धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज गायकवाड याने 58 धावांची खेळी केली. संजू सॅमसन याने 40 धावांचे योगदान दिले. रिंकू सिंह याने झटपट 38 धावांचे योगदान दिले.
रिंकू-शिवमची दमदार खेळी
आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रिंकू सिंह याने 21 चेंडूत 38 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. तर शिवम दुबे याने 16 चेंडूत दोन षटकाराच्या मदतीने नाबाद 22 धावा जोडल्या. मोक्याच्या क्षणी रिंकू आणि शिवम यांनी वेगाने धावा केल्या.
रिंकू-शिवमचा फिनिशिंग टच
युवा रिंकू सिंह आणि शिवम मावी यांनी भारताला जबरदस्त फिनिशिंग दिली. अखेरच्या काही षटकार या जोडीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत भारताची धावसंक्या 180 च्या पार पोहचवली. रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांनी अवघ्या 28 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. यामध्ये रिंकूने 12 चेंडूत 28 चक शिवम याने 16 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले.
ऋतुराज-संजूने डाव सावरला
यशस्वी जायस्वाल आणि तिलक वर्मा लागोपाठ तंबूत परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ऋतुराज गायकवाड याने 43 चेंडूत 58 धावांची झंझावती खेळी केली. तर संजू सॅमसन याने 26 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड याने एक षटकार आणि चार चौकार ठोकले. तर संजू सॅमसन याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 49 चेंडूत 71 धावांची दमदार भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्याआधी यशस्वी जायस्वाल याने 11 चेंडूत 18 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. तिलक वर्मा याला आजच्या सामन्यातही लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. पहिल्या सामन्यात तिलक वर्मा गोल्डन डकचा शिकार झाला होता. तर आजच्या सामन्यात तिलक वर्मा याला फक्त दोन धावा करता आल्या.