मुंबई : हैदराबाद कसोटीमध्ये भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव झाला होता. आता दुसऱ्या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल या अनुभवी खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. हैदराबाद कसोटी सामन्यावेळी दोघांनाही दुखापत झाली होती. बीसीसीआयने तीन खेळाडूंना चमूमध्ये संधी दिली आहे. सरफराज खान याला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान दिलेय.
सरफराज खानही तिघांना संधी
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघामध्ये तीन खेळाडूंना स्थान देण्यात आलेय. अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर, सर्फराज खान आणि सौरभ कुमार यांना भारताच्या स्क्वाडमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. 26 वर्षीय स्टार फलंदाज सरफराज खान सध्या जबराट फॉर्मात आहे. त्याने 2020 पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. मुंबईकडून खेळताना त्याने 44 सामन्यात 68 च्या सरासरीने 3751 धावा चोपल्या आहेत. त्यादरम्यान त्याने 13 शतके आणि 11 अर्धशतके ठोकली आहेत. सरफराज खान इंडिया अ संघाचाही सध्या आहे. त्याने नुकतीच इंग्लंड लॉयन्सविरोधात 55 आणि 96 धावांची खेळी केली. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदरही भारतीय संघात कमबॅक करणार आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वॉशिंगटन सुंदर याने अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले होते. गाबा कसोटीमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी केली होती. सौरभ कुमार याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढल्या आहेत.
जाडेजा, केएल दुसऱ्या कसोटीतून बाहेर
हैदराबाद कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल दुखापतग्रस्त झाले होते. रवींद्र जाडेजा याला हॅमस्ट्रींगचा त्रास जाणवतोय. तर केएल राहुल याला उजव्या मांडीला दुखापत झाली आहे. बीसीसीआयची मेडिकल पथक या दोघांच्या फिटनेसवर काम करत आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार) , मुकेश कुमार, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंगटन सुंदर, सौरभ कुमार