शासन नियुक्तपदी तीन सदस्यांच्या निवडीही जाहीर
निपाणी (वार्ता) : निपाणी, चिक्कोडी, अथणी, कागवाड, रायबाग कार्यक्षेत्र असलेल्या येथील टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी संयोगीत ऊर्फ निकु पाटील यांची निवड करण्यात आली. शासन नियुक्त सदस्यपदी तीन जणांची नगरविकास खात्याने निवड केल्याची माहिती निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांनी शुक्रवारी (ता.१५) येथील येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत दिली.
संजीव कांबळे- दरूर (अथणी) रेवण्णा सरव अळगवाडी (रायबाग) व सोहेल अहमद मुल्ला (रायबाग) अशी सदस्यपदी निवड झालेल्याची नावे आहेत.
राजेश कदम म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विविध पदावर शासन नियुक्त्या सुरू केल्या आहेत.गेल्या आठवड्यात निपाणी नगरपालिकेच्या शासन नियुक्त नगरसेवकपदी पाच जणांच्या निवडी झाल्या आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या सूचनेनुसार वरील नावाची नगरविकास खात्याचे मंत्री रहीम खान यांनी या निवडी केल्या.
काँग्रेस पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. नूतन अध्यक्ष व सदस्यांनी सदस्यांनी पदाच्या माध्यमातून लोकाभिमुख कामे करावीत. शिवाय शहर सुशोभीकरणासाठी नियोजन करून शहराच्या वैभवात भर घालावी. पक्षाच्या कार्यासाठी कार्यरत राहून शासनाच्या असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन कदम यांनी केले.
निवडीनंतर अध्यक्ष निकु पाटील म्हणाले, टाऊन प्लॅनिंग कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व विभागामध्ये आपण पदाच्या माध्यमातून माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करू. शहर विस्तारीकरणासाठी अनेक जागा राखीव आहेत. त्याचा उपयोग करून घेऊ.
यावेळी निकु पाटील यांचा राजेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर पाटील समर्थकांनी काँग्रेस कार्यालयासमोर फटाक्याची आतषबाजी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय शेटके, विश्वास पाटील, शासन नियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर, ॲड. एस. एस. चव्हाण, रवींद्र श्रीखंडे, फारुख गवंडी, विनोद बल्लारी, संदीप चावरेकर, युवराज पोळ, सागर पाटील, इंद्रजीत जामदार, निलेश येरुडकर, रमेश भोईटे, जीवन घस्ते, प्रकाश मगदूम, राजू नवनाथ चव्हाण, संदीप इंगवले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.