खानापूर : संपूर्ण राज्यात आज सोमवार दिनांक २५ मार्च पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून, खानापुरात सुद्धा पोलिसांच्या चोख बंदोबस्तात परीक्षेला सुरुवात झाली. आज परीक्षेचा प्रथम भाषेचा पेपर होता. आज परीक्षा सुरुवातीचा पहिलाच दिवस असल्याने, आपापल्या मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यासाठी, पालकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परीक्षा केंद्रांना यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
खानापूर तालुक्यात एकूण ११ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, तालुक्यात एकूण ३७३३ विद्यार्थ्यापैकी ३७१५ विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली. तर एकूण १८ विद्यार्थी गैरहजर राहिले असल्याची माहिती, खानापूर तालुक्याच्या शिक्षणाधिकारी राजेश्री कुडची यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे. यावर्षी पहिलीच वेळ दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थ्यांची संख्या ३६५० असून, त्यापैकी ३६४२विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याने, आठ विद्यार्थी गैरहजर राहिले. तर पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८३ असून त्यापैकी ७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे दहा विद्यार्थी गैरहजर राहिले असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.
तालुक्यातील संपूर्ण अकरा परीक्षा केंद्रावर नजर ठेवण्यासाठी, खानापुरातील बीईओ कार्यालयात, सीसीटीव्ही कॅमेराचा एक कक्ष बनवण्यात आला असून, त्याद्वारे तालुक्यातील संपूर्ण परीक्षा केंद्रावर, नजर ठेवण्यात आली होती. त्यामध्ये कणकुंबी येथील माऊली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर, शिरोली सरकारी हायस्कूलचे श्रीपाद कुलकर्णी, बिडी हायस्कूलचे पी डी पांडवे, हलशी हायस्कूलचे आर एस कोलकार आदी जणांची नेमणूक करण्यात आली आहे.