मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना तर सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीच्या जागेवर काॅंग्रेसने दावा केला असतानाही येथून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे, धाराशीवमधून ओमराजे निंबाळकर, बुलढाणा येथून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ- वाशिम येथून संजय देशमुख, मावळ येथून संजोग वाघेरे- पाटील, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीतून विनायक राऊत, ठाणे येथून राजन विचारे, मुंबई- ईशान्य संजय दिना पाटील, मुंबई- दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई- वायव्य येथून अमोल कीर्तिकर आणि परभणीतून संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तसेच मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सांगलीत सामना रंगणार
चंद्रहार पाटील यांना ठाकरे शिवसेना गटाने सांगली लोकसभा रिंगणात उतरवले आहे. सांगली मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे पैलवान चंद्रहार यांच्यात धूमशान सुरू आहे. काँग्रेसने ही जागा आपणच लढणार, असे पुन्हा पुन्हा सांगितल्याने तिढा निर्माण झाला आहे. भाजपने पहिल्या यादीतच सांगलीतून विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महाविकास आघाडीत मात्र जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. कोल्हापूरची आमची जागा काँग्रेसला सोडली असे सांगून, त्याबदल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा ठोकला आणि आता सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणाही ठाकरे गटाने केली आहे.