निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनाराला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील जवाहर तलाव मधील गाळ काढून खोली वाढविण्याची मागणी गत वर्षापासून नागरिकांतून होत आहे. मागणी योग्य असली तरी तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यानंतर जुन्या तटबंदीचा (संरक्षण भिंत) टिकाव लागणार का? याचाही विचार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी पत्रकारद्वारे केली आहे.
पत्रकातील माहिती अशी, जवाहर तलाव निर्मितीवेळी दगडी तटबंदी बांधली आहे. पण त्याला बरीच वर्षे उलटल्याने तटबंदीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळी पुंज लॉइड कंपनीने तलावातील गाळासह मुरूम बाहेर काढले होते. त्यामुळे पाणी साठ्यात निश्चितच वाढ होत आहे. आता पुन्हा गाळ काढण्यात बाबत नेते मंडळी व नगरपालिकेची चर्चा सुरू आहे. तलावातील गाळ काढल्यानंतर पाणीसाठ्यात आणखीन वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याचा दाब या तटबंदीला सोसतो किंवा नाही, याबाबतही सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वसमावेशक बैठक बोलून योग्य निर्णय घेण्याची मागणी गाडीवड्डर यांनी केली आहे.