खानापूर : खानापूरात वनक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांतील अनुसुचित जाती, जमाती व अन्य वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वन जमिनी मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समिती गेली तीन चार वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक बैठका, शिबीरे, कार्यशाळा आदिंच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये व लोकांच्यात त्यांच्या हक्काधिकाराबाबत जागृती करून व धरणे, मोर्चे आदी कार्यक्रम हाती घेऊन शासकीय पातळीवर लोकांच्या मागण्या मांडण्याचे काम वनहक्क संघर्ष समिती करत आहे. या लढयाचा भाग म्हणून वनहक्क समितीतर्फे दि. ३० मे रोजी मा. संपतराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. मागील शिबीरात वनहक्कांसाठीच्या दाव्यांचे अर्ज तयार करण्यासाठी लोकांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक गावच्या लोकांनी विहित नमुन्यातील आपले अर्ज सोबत आणले होते. तयार झालेले अर्ज यावेळी तपासण्याचे काम हाती घेण्यात आले व त्यात कांही तृटी आढळून आल्याने त्या निदर्शनास आणून त्या दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली.
यावेळी शिबीराचे निमंत्रक श्री. महादेव मरगाळे यांनी प्रास्ताविक करून शिबीराचा उद्देश सांगितला. त्यांनी दाव्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये जमीनीचे नकाशे, फोटो इ. योग्य पद्धतीने जोडले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित श्री. अभिजित सरदेसाई यांनीही आपले विचार मांडले व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी म्हणून सूचना केली. तद्नंतर श्री. संपतराव देसाई यांनी उपस्थितांना दाव्यांचे अर्ज का परिपूर्ण असणे गरजेचे आहे हे विशद केले. अंतिमतः तळावडे गावच्या खाचु कुलम यांनी आभार मानले. शिबीराला तळावडे, डोंगरगांव, अबनाळी आदी गावातून बहुसंख्येने लोक उपस्थित होते.