बेळगाव : बेळगावमध्ये संघाच्या कर्जाच्या जाळ्यात सापडून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील महिलांनी आज मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.
संघातून कर्ज मिळवून देण्यासाठी कमिशनची मागणी करत हजारो महिलांची आर्थिक फसवणूक करत एका महिलेने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये अनेक महिलांच्या नवे सदर महिलेने कर्ज उकळून ते न फेडल्याने याचा भुर्दंड हजारो महिलांना सोसावा लागला आहे.या प्रकरणातील महिलांनी आज आरटीओ सर्कलजवळील काँग्रेस भवनला भेट दिली. लहान मुलांना हातात घेऊन महिलांनी न्याय देण्याची मागणी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली.यावेळी आपल्या झालेल्या फसवणुकीबद्दल संपूर्ण माहिती महिलांनी दिली. कर्ज देण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून कमिशन उकलण्यात आले. आपल्या नावावर कर्ज उचलून सदर महिलेने त्याची परतफेड केली नाही. आता कर्ज दिलेल्या फायनान्स कंपन्यांकडून आपल्याकडे परतफेडीसाठी तगादा लावण्यात येत असून आपल्याला या प्रकरणी न्याय देण्यात यावा, फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली. मोलमजुरी करून उदरनिर्वाह सांभाळणाऱ्या महिलांच्या नावे कर्ज घेऊन कर्जाची परतफेड करण्यात आलेली नाही. संबंधित महिलेमुळे आपण आर्थिक अडचणीत सापडलो असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका महिलेंने केली. फसवणूक झाल्याप्रकरणी जमलेल्या महिलांची मोठी गर्दी काँग्रेस भवनासमोर झाली होती. या प्रकरणी काकती पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.