दोन्ही गटांच्या दिल्ली, बंगळुरात बैठका; तरुण चुघ सदस्यत्व अभियानासाठी बंगळूरात
बंगळूर : भाजप केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य सचिव ओम पाठक यांनी विजापुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना उद्या (ता. ४) भेटण्यासाठी बोलावले आहे, असे पक्षाचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत बोलताना सांगितले.
आज दिवसभर बंगळूर व नवीदिल्लीत यत्नाळ समर्थक व विरोधी गटांच्या बैठका होऊन परस्पर विरोधी मते मांडण्यात आली. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांचे आज बंगळूरला आगमन झाले. परंतु ते दोन्ही गटाची मते आजमावून घेण्यासाठी नाही, तर संघटना दिन, सदस्यत्व अभियाना संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पाठक यांनी यत्नाळ यांना एक डिसेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती, प्रदेश भाजपच्या नेतृत्वाविरुद्ध वक्तव्य, पक्षाच्या निर्देशांचे उल्लंघन आणि पक्षाच्या अधिकृत धोरणाविरुद्ध भूमिका आदी तक्रारीवरून यत्नाळ यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यत्नाळ यांना उत्तर देण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
“ओम पाठक यांनी आज (ता. ४) सकाळी साडे अकरा वाजता यत्नाळ यांना भेटायला बोलावले आहे. ते एकटेच त्याना भेटायला जातील. आम्ही त्याच्यासोबत जाणार नाही. त्याना उद्या कुठे यायला सांगितले आहे ते मला माहीत नाही. त्याचे उत्तर ते उद्याच देतील, असे जारकीहोळी यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले.
यत्नाळ हे भाजपचे दिग्गज आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबाचे, विशेषत: त्यांचा मुलगा आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेकदा त्यांच्यावर निशाणा साधला आणि काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणाविरुद्ध प्रभावीपणे लढण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने येडियुरप्पा यांच्या घराणेशाहीचे राजकारण तपासावे अशी मागणी केली आहे.
आमदार रमेश जारकीहोळी, अरविंद लिंबावळी, महेश कुमठळ्ळी, मधु बंगारप्पा यांच्यासह भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांसह यत्नाळ यांनी बिदर ते चामराजनगर असा महिनाभर चाललेला वक्फविरोधी मोर्चा काढला आहे. २५ नोव्हेंबरला निघालेल्या या पदयात्रेची २५ डिसेंबरला सांगता होणार आहे.
यत्नाळांचे समर्थन
कर्नाटक भाजप नेत्यांचा एक गट बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस मिळाल्यानंतरही त्यांचे जोरदार समर्थन करत आहे.
बी. एस. येडियुरप्पा छावणीचे विरोधी मानले जाणारे भाजप नेते यत्नाळ यांच्यावर कारवाई करू नयेत यासाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे लॉबिंग करत आहेत.
माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, चित्रदुर्गाचे खासदार गोविंद करजोळ आणि चिक्कबळ्ळापूरचे खासदार सुधाकर यांनी सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांची रेल्वे भवन येथे भेट घेतली आणि भाजपच्या प्रदेश शाखेमधील भांडणावर अनौपचारिक चर्चा केली.
या नेत्यांनी यत्नाळ यांना पाठिंबा दिल्याचे आणि वक्फविरोधी रॅली काढण्यासाठी त्यांना पाठिंबा दिल्याचे कळते. या नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची आणि राज्य भाजप युनिटमधील सध्याच्या संकटाबद्दल त्यांचे मत स्पष्ट करण्याची योजना आखली आहे.
खासदारांची बैठक
गेल्या आठवड्यात, विश्वेश्वर हेगडे कागेरी, जगदीश शेट्टर आणि वीरण्णा काडाडी यांच्यासह काही खासदारांनी केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली आणि राज्य युनिटमधील गटबाजीबद्दल चर्चा केली. त्या बैठकीतही अनेक नेत्यांनी यत्नाळ यांना पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
संघटनेतील निर्णय घेण्यापूर्वी विजयेंद्र सर्व नेत्यांना विश्वासात घेत नसल्याची तक्रारही अनेक संसद सदस्यांनी जोशी यांच्याकडे केली होती.
यत्नाळांच्या हकालपट्टीची मागणी
पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, प्रदेश सहप्रभारी सुधाकर रेड्डी, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, सरचिटणीस प्रीतम गौडा, ज्येष्ठ सदस्य सी. टी. रवी, एन. रविकुमार आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यत्नाळ यांची हकालपट्टी करावी, असे मत व्यक्त केले.
यत्नाळ यांची पक्षातून हकालपट्टी केली तरच इतरांनाही धोक्याचा संदेश जाईल, असे मत २१ हून अधिक जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, सरचिटणीस, उपाध्यक्ष आदींनी व्यक्त केले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी बैठकीत यत्नाळ यांच्या विरोधात व्यक्त केलेली मते ऐकून तुमची मते ज्येष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याची ग्वाही दिली.
तक्रार ऐकण्यासाठी नाही
आजच्या बैठका केवळ संघटना दिन, सदस्यत्व अभियानापुरत्या मर्यादित आहेत. त्यामुळे या मंचावर चर्चेची गरज नसल्याचे तरुण चुघ यांनी सांगितले.
दरम्यान, चुघ हे कोणत्याही ओपिनियन पोलसाठी राज्यात आलेले नाहीत. सदस्यत्व मोहिमेत सहभागी होण्यासाठी आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी स्पष्ट केले. वरिष्ठांच्या सूचनेवरून राज्यातील भाजपमधील दुफळीच्या राजकारणाची वस्तुस्थिती तपासून वरिष्ठांना अहवाल देण्यासाठी तरुण चुग राज्यात आल्याचे वृत्त फेटाळून लावत, तरुण चुग यांची ही राजकीय भेट नसल्याचे ते म्हणाले.
यत्नाळांची दिल्लीत बैठक
यत्नाळ यांना भाजप हायकमांडने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतरही पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी असंतुष्ट गटातील नेत्यांनी दिल्लीत बैठक घेतली. आज सकाळी कर्नाटक भवनात बैठक झाली. वरिष्ठांनी दिलेल्या नोटीसला कसे उत्तर द्यायचे आणि प्रदेश भाजपमधील घडामोडींबाबत वरिष्ठांच्या निदर्शनास कोणते पैलू आणायचे यावर या नेत्यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येते.
भाजपचे वेगवेगळे नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत माजी मंत्री रमेश जारकीहोळी, अरविंद लिंबवळी, कुमार बंगारप्पा, आमदार बी. पी. हरीश, माजी खासदार बी. व्ही. नाईक, मुख्यमंत्र्यांचे माजी राजकीय सचिव एन. आर. संतोष, नेते रवी बिरदार यांच्यासह अनेक नेत्यांचा सहभाग होता.