Friday , April 17 2026
Breaking News

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love

 

बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह इतर १६ आरोपींना दोषी ठरवले असून, शिक्षेची मात्रा उद्या (ता. १७) जाहीर करण्यात येणार आहे.

आज न्यायालयात शिक्षेच्या प्रमाणाबाबत सरकारी पक्ष व बचाव पक्ष यांचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले. न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी आरोपींनी योगेश गौडा यांच्या हत्येसाठी गुन्हेगारी कट रचल्याचे सिद्ध झाल्याचे नमूद करत त्यांना दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपींना बेकायदेशीर जमाव, दंगल आणि खून या गुन्ह्यांखालील विविध कलमांनुसार दोषी ठरवले आहे. यात भारतीय दंड संहितेचे कलम ३०२ (खून) तसेच कलम १२०(ब) (कटकारस्थान) यांचा समावेश आहे. काही आरोपींना पुरावे नष्ट केल्याच्या आरोपातही दोषी ठरवण्यात आले आहे.

दरम्यान, २० वे आरोपी वासुदेव राम निलेकणी (धारवाड उपनगर विभागाचे एसीपी) आणि २१ वे आरोपी सोमशेखर बसप्पा न्यामगौड (विनय कुलकर्णी यांचे निकटवर्तीय) यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

जून २०१६ मध्ये धारवाड येथील जिम्नॅशियममध्ये भाजप नेते व जिल्हा पंचायतचे माजी सदस्य योगेश गौडा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तपास केला होता; मात्र नंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात १०० हून अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली होती.

कुलकर्णींच्या बसला आग

हत्याकांडात दोषी ठरलेले माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना परप्पन अग्रहार केंद्रीय कारागृहात हलवित असताना बुधवारी हायड्रामा घडला. कुलकर्णी यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन दाट धूर पसरला. ही घटना परप्पन अग्रहार कारागृहाजवळ घडली. काही वेळातच बसमध्ये आग लागल्याचेही दिसून आले, त्यामुळे बसमधील आरोपी तसेच सीबीआयच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मात्र, सतर्कतेने काम करत सीबीआय एस्कॉर्ट पथकाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर आरोपींना दुसऱ्या वाहनांतून कारागृहात हलविण्यात आले.

या प्रकरणात विशेष न्यायालयाने बुधवारी विनय कुलकर्णी यांच्यासह १६ जणांना दोषी ठरवले होते. गुन्हेगारी कट आणि खूनाचे आरोप सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

प्राथमिक माहितीनुसार, डिझेल गळती किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीबीआय पथकाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

दहावी परीक्षेत तृतीय भाषेसाठी गुणांऐवजी ग्रेड देण्याचा प्रस्ताव मसुदा अधिसूचना जाहीर

Spread the love  बंगळूर : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दहावी (एसएसएलसी) परीक्षेत तृतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *