Sunday , July 26 2026
Breaking News

मंत्रालयाजवळ भीषण अपघात; कर्नाटकातील ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Spread the love

 

बंगळूर : आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मंत्रालयाजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. चिलकलडोना गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६७ वर हा अपघात घडला.
माहितीनुसार, चिक्कमगळूरहून मंत्रालय येथे राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी निघालेल्या अशोक लेलँड या मालवाहू वाहनाची आणि बीदरहून तुमकूरकडे जात असलेल्या फ्लाय-अॅश लारीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
या दुर्घटनेत कुमार (वय ५०), दीपिका (वय ४२), सुनील( वय ४०), यशोदम्‍मा (वय ६०), पुट्टम्मा (वय ५५), बेल्ली (वय ३), लोलाक्षी आणि मीनाक्षी यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच महिला, दोन पुरुष आणि तीन वर्षांची एक बालिका यांचा समावेश आहे.
या अपघातात ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कर्नूल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच आणखी चार जणांवर यम्मिगनूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हासन आणि चिक्कमगळूर येथील एकूण २३ जण मालवाहू वाहनातून प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. तर लारीने नियंत्रण गमावून रस्त्याच्या कडेला पलटी घेतली.
घटनेची माहिती मिळताच यम्मिगनूर उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) भार्गवी आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मंत्रालय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
डीवायएसपी भार्गवी यांनी सांगितले की, “धर्मपुरम टोल प्लाझा ओलांडल्यानंतर सुमारे १०-१२ किलोमीटर अंतरावर चिलकलडोना गावाजवळ हा अपघात झाला. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन ८ जणांचा मृत्यू झाला. जखमींना कर्नूल आणि यम्मिगनूर येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपशील तपासानंतर स्पष्ट होईल.”

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *