
बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाऊन हॉल उदय भवन येथे सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच 33% महिला आरक्षण यावर प्रकाश टाकणे हा उद्देश समोर ठेवून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी माजी खासदार सौ. मंगला अंगडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संयोजिका डॉ. सोनाली सरनोबत यांनी प्रास्ताविक भाषणात महिलांनी लाभार्थी न राहता निर्णय प्रक्रियेत सक्रिय सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्व करणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार भाजप संजय पाटील, डॉ. मनीषा भांडणकर, डॉ. प्रिया पुराणिक, डॉ. मयुरा शिवलकर, अनिता कणबर्गी, सौ. मोनिका सावंत, सौ. नागरत्ना रामगोंडा आदी उपस्थित होते.
माजी आमदार संजय पाटील यांनी बोलताना 33% महिला आरक्षण विधेयकाचे स्वागत करताना सांगितले की, हा निर्णय देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. महिलांचे प्रतिनिधित्व वाढवून सशक्त भारत घडविण्यात हा निर्णय नक्कीच मोलाचा ठरेल असे मत व्यक्त केले. तसेच डॉक्टर मनीषा भांडणकर यांनी महिलांची आरोग्य क्षेत्रातील भूमिका अधोरेखित करत त्यांनी मातृ व बाल आरोग्य धोरणांमध्ये महिलांचा सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
डॉ. प्रिया पुराणिक यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देत त्यांनी उद्योजकतेच्या माध्यमातून समाजात भक्कम स्थान निर्माण करावे असे नमूद केले. तसेच मयुरा शिवलकर यांनी आयर्न मॅन खेळाडू म्हणून आपल्या अनुभवातून महिलांना प्रेरणा देत सांगितले की, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महिलांना कोणत्याही मर्यादा अडवू शकत नाहीत.
यावेळी अनिता कणबर्गी यांनी महिलांसाठी आर्थिक साक्षरतेचे महत्व अधोरेखित करत सांगितले की, आर्थिक दृष्ट्या सक्षम महिला कुटुंब व समाज अधिक मजबूत बनवतात. मोनिका सावंत यांनी नगर विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये महिलांच्या नेतृत्वाची गरज अधोरेखित करत त्यांनी समावेशक विकासासाठी महिलांचा सहभाग अनिवार्य असल्याचे नमूद केले.
तसेच नागरत्ना रामगौडा यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचे महत्त्व सांगत ग्रामस्तरावर जागरूकता वाढविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमांतर्गत मिस्ड कॉल अभियान तसेच स्वाक्षरी अभियान देखील राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी तमुचे यांनी केले व चर्चेला योग्य दिशा दिली. सदर कार्यक्रम महिलांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण करणारा ठरला महिलांनी पुढे येऊन नेतृत्व स्वीकारावे असा प्रेरणादायी संदेश देत या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta