खानापूर : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर तसेच खानापूर तहसीलदार यांनी आज खानापूर तालुक्यात पावसामुळे पडलेल्या घरांचा पहाणी दौरा केला. खानापूर तालुक्यात पावसामुळे एकूण 201 घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी 39 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली असल्याचे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस सरकार हे नेहमीच सामान्य जनतेच्या सोबत आहे. माणुसकीच्या दृष्टीने सिद्धरामय्या सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्यानुसार संपूर्ण घर पडलेल्या कुटुंबियांना सरकारतर्फे 1 लाख 20 हजार रुपये तर मागासवर्गीयांसाठी 1 लाख 50 हजार रु.अनुदान देणार आहेत. त्याचबरोबर राजीव गांधी योजनेतून तसेच देवराज अर्स योजनेतून पक्की घरे बांधून देणार असल्याचे कालच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितल्याचे डॉ. अंजली निंबाळकर यांनी सांगितले.
तालुक्यात ज्यांची ज्यांची घरे पडली आहेत त्यांना तात्काळ नुकसानभरपाई देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत, असे देखील अंजलीताई म्हणाल्या.
आज तालुक्यातील बिडी, गोल्याळी, होसट्टी आदी गावांना भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत खानापूर तहसीलदार, उपतहसिलदार, सर्कल, पट्टण पंचायत सीईओ, तसेच सीपीआय उपस्थित होते.