पॅरिस : भारताच्या २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. अमनने चुरशीच्या लढतीत पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूचा १३-५ असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे पॅरिस ऑलिम्पिकच्या १४ व्या दिवशी भारताने सहावे पदक जिंकले आहे. भारताच्या अमन सेहरावतने पहिल्या फेरीत वर्चस्व राखले आणि प्रतिस्पर्ध्यावर ६-३ अशी आघाडी घेतली. यानंतर अमनने दुसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम राखली.
अमन आशियाई चॅम्पियन राहिला असून २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताला कुस्तीत पदकाची अपेक्षा होती, ती अमनने पूर्ण केली आहे. याआधी सर्वांना विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती मात्र अतिरिक्त वजनामुळे तिला साम्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले. अशा परिस्थितीत अमनचे हे पदक कुस्तीत भारतासाठी दिलासादायक बाब ठरले आहे.
सामन्याच्या शेवटच्या दोन मिनिटांत अमनने पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूवर ८-५ अशी आघाडी घेतली. यादरम्यान क्रुझ डॅरिएन तोई पूर्णपणे दमलेला दिसला. परिस्थिती अशी बनली की त्याला ब्रेक घ्यावा लागला. शेवटची एक मिनिट बाकी असताना अमनने १२-५ अशी आघाडी मिळवली होती. वेळ संपताच अमनने १३ गुणांसह सामना जिंकला. अशा प्रकारे भारताला १४व्या दिवशी सहावे पदक मिळाले आहे.