खानापूर : शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील निलावडे सीआरसी अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कान्सोली येथील मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. लोहार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष राजू कदम, आशिष कोचेरी उपस्थित होते.
यावेळी कबनाळी, मालव, दारोळी, कोकणवाडा, ओत्तोळी, अल्लोळी, बांदेकर वाडा, कानसोली, नागुर्डे, मुगावडे, कापोली, आंबोळी, कांजळे, नागुर्डेवाडा, निलावडे, मोदेकोप, काटगाळी, मुडगई या शाळांमध्ये साहित्याचे वितरण झाले.
सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती टिकवायची असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजे आणि त्यासाठी शिक्षक, पालक आणि आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी व्यक्त केले.
श्री. आबासाहेब दळवी यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व सांगितले.
यावेळी सर्व शाळेचे मुख्याध्यापक तसेच सहशिक्षक उपस्थित होते. श्री. कौंदलकर यांनी सूत्रसंचालन केले.