खानापूर : शासनातर्फे शेतीला उपयुक्त यंत्रोपकरणांवर व औजारांवर अनुदान दिले जाते. यात पावर टिलर, पावर विडर (मशागत यंत्र), रोटावेटर, पंपसेट, शाफ कटर (कुट्टी यंत्र) इत्यादी येतात. अशी यंत्रे व औजारे महागडी असल्याने शेतकऱ्यांना ती स्वस्त दरात मिळावी म्हणून शासन अनुदान मंजूर करत असते. सन 2024 सालच्या हंगामा करता खानापूरच्या शेतकी विभागाने शेतकऱ्यांकडून सदर अनुदानासाठी अर्ज मागवले होते. त्याप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केलेल्या खानापूरातील शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरून घेऊन पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारी पावर विडर/मशागत यंत्रे देण्यात येत आहेत. यात शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पाहिजे त्या क्षमतेचा पावर विडर निवडता येतो. शासनाच्या या अनुदान योजने अंतर्गत ५ एचपी पेक्षा अधिक क्षमतेच्या पावर विडरना सबसिडी दिली जात आहे. टेक्सास (Texas), व्हएसटी (VST) अशा नामांकित कंपन्यांच्या पावर विडरना शासन मान्यता आहे व अशा कंपन्यांची यंत्रे खानापूरच्या प्रगती ॲग्रो मार्ट मध्ये आता उपलब्ध आहेत. नुकतेच टेक्सास कंपनीच्या ६ एचपी व ७ एचपी क्षमतेच्या पावर विडरचे शेती विभागाकडून वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये खानापुर तालुक्यातील कुपुटगिरी व वड्डेबैल गावच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. खानापुरातील प्रगती ॲग्रो मार्ट यांच्याकडून हे पावर विडर खरेदी करून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. शासनाच्या या योजनेसाठी मर्यादित निधी आला असल्याने शेतकऱ्यांनी सबसिडीचा लवकर लाभ घ्यावा असे शेतकी विभागाकडून सुचविण्यात आले आहे.