सदलगा : शमनेवाडी येथील शेतजमीनीच्या रस्त्यासाठी झालेल्या वादाचे पर्यवसान खूनामध्ये झाल्याची घटना शनिवार दि. ५ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, शमनेवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सुनिल आण्णासाहेब केत्ताप्पा खोत (वय ४८ वर्षे) व त्यांच्या भाऊबंदांमध्ये शेतीसंबंधी व शेतजमीनीतील रस्त्यासाठी सन २००८ पासून न्यायालयात दावा दाखल आहे. आज सकाळी शीतल सुभाष केत्ताप्पा खोत (वय ३० वर्षे रा. शमनेवाडी) व पद्माकर भरत केत्ताप्पा खोत (वय २८ वर्षे रा. शमनेवाडी) यांनी सुनिल यांचे शेतामधील गवत कापून जे.सी.बी च्या सहाय्याने रस्ता करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुनिल यांचा शितल, पद्माकर व त्यांचे कुटुंबातील व्यक्तींशी वाद विवाद होऊन सदर जमिनीवर दावा चालू असलेने न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ता करा असे सुनिल यांनी सांगितले. तरीही शितल व पद्माकर यांनी त्यांचे कांहीही न ऐकता वादातील जमिनीत रस्ता करण्याचे काम चालू ठेवले, याचे मोबाईल चित्रण सुनिल यांनी करून सदलगा पोलिसांत फोन करून कळविले. नंतर सदलगा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता शीतल व पद्माकर यांना ठाण्यात बोलावून चौकशी करूया, तुम्ही सायंकाळी या असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर सुनिल हे सदलगा पोलिस ठाण्यातून घरी परत जात असताना सदलगा येथील मल्लिकार्जुन कल्याण मंडप ते शमनेवाडी या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या शीतल केत्ताप्पा खोत व पद्माकर केत्ताप्पाखोत या दोघांनी विळ्याच्या सहाय्याने सुनिल याचेवर हल्ला केला, वर्मी घाव लागल्याने सुनिल याचा जागीच मृत्यु झाल्याची माहिती सुनिल याचे मोठे बंधू रामचंद्र आण्णासाहेब केत्ताप्पा खोत यांनी दिली. घटनास्थळी चिकोडीच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रृती एस. एन, मंडल पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांनी तातडीने भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. रामचंद्र केत्ताप्पा खोत यांनी सदलगा पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास चालू आहे.