राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्त; अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार (ता. ९) पासून (ता. १९) पर्यंत राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे. या पार्श्वभूमीवर निपाणी पोलिसांच्यावतीने कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे.
रविवारपासून सीमेवर जादा पोलिस मागवून नाकाबंदीची कार्यवाही सुरू केली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चार चाकी वाहनधारकांची चौकशी करून सोडण्यात येत आहेत.
चिकोडी डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी, एएसआय एस. ए. टोलगी, अमर चंदनशिव, काडगौडर, भैरवनावर, शिवप्रसाद किवडण्णावर, पी. ए. तळवार, पीएसआय एस. बी. होलोकर, एएसआय एम. बी. नेसरगी यांच्यासह रिझर्व्ह पोलिस २३ असा बंदोबस्त सुरू आहे. सोमवारी आणखी बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे.
सोमवार तारीख ९ रोजी उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्या वतीने कर्नाटक शासनाला निवेदन देण्यासाठी महाराष्ट्रातून बेळगाव येथे अधिवेशन मध्ये जाणार आहेत. कर्नाटक प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित रहावा यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील नेतेमंडळी मेळाव्यासाठी बेळगावकडे जातात. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काळात जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनेच्या आधारे ज्या त्या वेळी आवश्यक त्या उपाययोजना करून कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती सीपीआय तळवार यांनी दिली.
——————————————————————
सोमवार ता. ९ ते १९ काळात कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलिस प्रशासनाने महामार्गावर कोगनोळी दुधगंगा नदीजवळ नाकाबंदीचे नियोजन केले आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बी. एस. तळवार (सीपीआय निपाणी)
,