आजरा : वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करून देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच स्विकारतांना उपलेखापाल तथा प्रभारी नायब तहसीलदार संजय श्रीपती इळके (वय 52) रा. उतूर (ता. आजरा) व इटे (ता. आजरा) या सजाचा तलाठी राहूल पंडीतराव बंडगर (वय33) मूळ रा. महाडिक कॉलनी, प्लॉट न. 27. ई. वार्ड कोल्हापूर या दोघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. येथील तहसीलदार कार्यालयात साफळा लावण्यात आला होता. आज दुपारी दीडच्या सुमाराला कारावाई करण्यात आली. तक्रारदाराने याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे आज दिली आहे.
तक्रारदाराने वर्ग 2 ची जमिन वर्ग 1 मध्ये करून द्यावी यासाठी इटे सजाचे तलाठी राहूल बंडगर यांची पंधरा दिवसांपूर्वी भेट घेतली होती. यावेळी बंडगर यांनी उपलेखापाल इळके व स्वत:ला यासाठी 1 लाख 50 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. दरम्यान तक्रारदाराने एवढी रक्कम आपल्याला देणे शक्य नसल्याचे सांगिीतले. त्यामुळे तडजोडी अंती 75 हजार रुपये देण्याचे ठरले.
आज ही रक्कम तहसीलदार कार्यालयातील इळके यांच्या कक्षात तक्रारदांराकडून स्विकारतांना इळके व बंडगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस उपआयुक्त सुहास नाडगोंडा, पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सजीव बंबर्गेकर, पोलीस हवालदार अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनिल घोसाळकर, रुपेश माने यांनी कारवाई केली.
महसुलमधील तालुक्यातील दुसरी कारवाई
आजरा तालुक्यात पाच वर्षांपूर्वी तहसीलदारांच्यावर कारवाई झाली होती. या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला आहे. त्यानंतर महसुलमधील ही दुसरी मोठी कारवाई आहे. आज ही कारवाई झाल्यावर महसुल कार्यालयात सन्नाटा पसरल्याचे दिसून आले. पुर्ण कार्यालयात शुकशुकाट दिसत होता.
Check Also
भाजपकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न : राहुल गांधी
Spread the love कोल्हापुरात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोल्हापूर : हिंदुस्थानात दोन …