बेळगाव : कोरोना संकट आटोक्यात आल्याने राज्य सरकारने अनलॉक ३.० जारी करत अनेक निर्बंध उठवले आहे. त्यानुसार बेळगावातील ‘दक्षिण काशी‘ म्हणून ओळखले जाणारे कपिलेश्वर मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुले केले आहे.
दुकाने, व्यापारी आस्थापनांना रात्री ९ वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देतानाच सरकारने भाविकांना दर्शनासाठी मंदिरेही खुली केली आहेत. त्यानुसार कोविड मार्गसूचीचे पालन करत बेळगावातील कपिलेश्वर मंदिर खुले करण्याचा निर्णय मंदिराच्या ट्रस्टींनी घेतला आहे. त्यानुसार, आज सोमवारपासून कपिलेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे भाविकांनी मंदिरात जात पूजाअर्चा केली व देवाचे दर्शन घेतले.
दरम्यान, मंदिर खुले करतानाच ट्रस्टने भक्तांसाठी कोविड मार्गसूचीची माहिती देणारा फलक मंदिराच्या प्रवेशद्वारातच उभारला आहे. मास्क लावल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सामाजिक अंतर पाळूनच देव दर्शन घ्यावे आदी सूचना त्यावर लिहिल्या आहेत. गेल्या २ महिन्यांपासून बंद असलेले कपिलेश्वर मंदिर आज खुले झाले असले तरी त्याची फारशी माहिती लोकांना नसावी, त्यामुळेच मंदिरात नेहमीप्रमाणे गर्दी दिसली नाही. उद्यापासून भक्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय लवकरच श्रावण महिना आणि सणांचे पर्व सुरु होणार आहे. पण त्यामुळे कोविड मार्गसूचीचे उल्लंघन होऊ नये याची दक्षता मंदिर व्यवस्थापनाने घेण्याची गरज आहे.