बेजबाबदार पर्यटकांकडून होतीये नासधूस
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारगडपासून अगदी ठराविक अंतरावर असणाऱ्या बाबा धबधब्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. या ठिकाणी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यांतील पर्यटकांची ये-जा होत असून दिवसेंदिवस बाबा धबधब्याला गर्दी होताना दिसत आहे.
निसर्गाचे नाविन्यपूर्ण सौदर्य व पाण्याचे प्रवाह या कड्यावरून पडताना वेगळेपण जाणवते. सभोवताली घनदाट जंगल, छोटे-छोटे धबधबे व वेडीवाकडी वळणे यामुळे हा परिसर निसर्गरम्य दिसत असून युवावर्गाचे आकर्षण वाढत आहे. या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावरती वाहनांची ये-जा वाढत चालली असून कित्येक कपल, युवापिढी शनिवार व रविवार हे हॉलिडेज दिवशी आस्वाद घेताना दिसत आहे. त्यामुळे हा एकंदरीत बाबा धबधबा पर्यटकांच्या पसंतीला उतरला असून पर्यटकांची गर्दी वाढत चालली आहे. तसेच काही बेजबाबदार पर्यटकांकडून या निसर्गरम्य वस्तुची नासधूस होताना दिसत आहे. कित्येक बेजबाबदार पर्यटकांकडून दारूच्या बाटल्या टाकणे, फोडणे तसेच केर-कचरा करणे, धिंगाणा घालणे यांसारख्या गोष्टीमुळे एकप्रकारे नासधूस होत असून यावर आळा घालणे ही गरजेचे आहे. तरी प्रशासनाने यावर लक्ष घालून बंदोबस्त किंव्हा अन्य नियमावली लावून या बाबा धबधब्याचे नाविन्य जपले जावे अशी मागणी येथील ग्रामस्थ व पर्यटकप्रेमींकडून होत आहे.