बेळगाव : बेळगावातील कोविड इस्पितळाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बुधवारी खासगी इस्पितळ संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठक घेतली. सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
बेळगावातील कोविड रुग्णांना दिले जाणारे उपचार, इस्पितळांतील सुविधा, उपचारांसाठी आकारले जाणारे शुल्क व अन्य विषयांवर चर्चा करून समस्या दूर करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. खासगी इस्पितळ संघटनेचे पदाधिकारी आणि इस्पितळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासगी इस्पितळ संघटनेचे सचिव डॉ. देवेगौडा यांनी सांगितले की, सरकारच्या धोरणाप्रमाणे खासगी इस्पितळांत कोरोनारुग्णांसाठी ५० टक्के बेड्स राखीव ठेवणे, बेड्सच्या उपलब्धतेबाबत अपडेट्स यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. खासगी इस्पितळांत सध्या ऑक्सिजनची समस्या नाही. रुग्णांना योग्य उपचार देण्यात येत आहेत. उपचारांचे शुल्क आकारताना समस्या येत आहे. सरकारने निर्धारित केलेले शुल्क समाधानकारक नाही. तथापि, ते सुधारण्याची विनंती सरकारला केली आहे. कोणतीही समस्या सोडविण्यासाठी सहकार्य देण्यास खासगी इस्पितळे सज्ज आहेत असे ते म्हणाले. खासगी इस्पितळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील म्हणाले, खासगी इस्पितळाच्या समस्यांबाबत बैठकीत उपयुक्त चर्चा झाली. उपचार शुल्क आकारताना काही कमी-जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे शुल्काची काही रक्कम आगाऊ भरणा केल्यास उपचार करणे सोपे जाते अशा सूचना करण्यात आल्या. खासगी इस्पितळांमध्ये उत्तम उपचार आणि सुविधा देण्यासाठी सरकारने शुल्कात सुधारणा केली पाहिजे. सरकार आणि खासगी इस्पितळाच्या सहकार्यामुळेच रुग्णांना उत्तम उपचार देता येतील अशी आमची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.
एकंदर जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी इस्पितळांसोबत घेतलेल्या या बैठकीत कोरोना रुग्णांवर उपचार, सुविधा, उपचार शुल्क आदींवर चर्चा करण्यात आली. मात्र
सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.