
मराठी पत्रकार संघातर्फे मराठी भाषा गौरव दिवस साजरा
बेळगांव : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा गेली २२ वर्षे प्रलंबित आहे. त्याची सलग सुनावणी करुन त्वरित निर्णय द्यावा, अशी विनंती सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना सीमा भागातून एक लाख सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला. या समारंभात हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य ऍड. महेश बिर्जे उपस्थित होते.
“लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी” या सुरेश भट यांच्या गौरव गीताने समारंभास प्रारंभ झाला. सुरुवातीस महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, म. ए. समिती युवा आघाडी सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांचे वडील विक्रांत शेळके, सामाजिक कार्यकर्ते अनंत जांगळे या दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मनोहर किणेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी पत्रकार संघाच्या कार्याची माहिती दिली. पत्रकार संघ प्रारंभापासून सीमावासीय मराठी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे ही संघाची बांधिलकी आहे. या बांधिलकीतूनच सरन्यायाधिशांना सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातील सर्व मराठी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
यानंतर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुहास हुद्दार, राजेंद्र पोवार, विलास अध्यापक, जितेंद्र शिंदे, शिवराज पाटील व शिवानी पाटील या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर सर्वश्री मनोहर किणेकर, मालोजीराव अष्टेकर, अंकुश केसरकर, सौ. रेणू किल्लेकर, धनंजय पाटील, ऍड. महेश बिर्जे यांची भाषणे झाली. आपल्या भाषणात त्यांनी सीमा लढ्याला बेळगांवबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबईच्या मराठी पत्रकारांनी पाठबळ दिले आहे. मराठी पत्रकार संघाने सीमा प्रश्नाच्या दाव्यासंदर्भात सरन्यायाधीशांना सह्यांचे निवेदन देण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी करण्यासाठी सहकार्य करु, असे आश्वासन दिले.
शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले व कार्यवाह महेश काशीद यांनी आभार मानले.
मराठी पत्रकार भवनात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र एकीकरण तालुका समिती उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, उमेश पाटील, किरण हुद्दार, सतीश देसाई, ऍड. अश्वजित चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
——————————————————————–
मराठी वकील संघटनेचा पाठिंबा
सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या दाव्याकडे सरन्यायाधीशांचे लक्ष वेधण्यासाठी सुरू केलेली एक लाख सह्यांची मोहीम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे मत सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे वकील महेश बिर्जे यांनी मांडले. तसेच त्यांनी मराठीभाषत वकील संघटनेचा मोहिमेला पाठिंबा घोषित करत मराठीभाषक वकिलांकडून सर्वाधिक सह्या संकलित केल्या जातील, असे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta