Tuesday , March 3 2026
Breaking News

मुले पळवणारी महिला समजून भिक्षुक महिलेला मारहाण : अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलीस आयुक्त भूषण बोरसे

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर येथे मुले पळवणारी महिला असल्याचे समजून नागरिकांनी एका निष्पाप भिक्षुक महिलेला मारहाण केल्याचा खुलासा बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केला असून नागरिकांनी सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन केले आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त आयुक्तालयातील आपल्या कार्यालयामध्ये जाहीर केलेल्या व्हिडीओद्वारे बोलत होते. पोलीस आयुक्त बोरसे यांनी म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यांपासून काही अपहरणकर्त्यांची टोळी बेळगाव शहरात कार्यरत असल्याची ऑडिओ क्लिप प्रसारित होत आहे. त्यामध्ये एक महिला हिंदी भाषेत सायकल दुरुस्तीसाठी घेऊन जाणाऱ्या आपल्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार करताना आणि कॅम्प बेळगाव येथे घटना कुठे घडली त्याचा पत्ता सांगताना दिसते. त्यावरून आम्ही कॅम्प पोलीस निरीक्षकांच्या करवी शहानिशा करून घेतली असता तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गेल्या दोन महिन्यात कोणत्याही टोळीकडून लहान मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा बेळगाव शहर व्याप्तीतील कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेला नाही. त्यामुळे संबंधित ऑडिओ क्लिप आमच्या शहरातील नसून कॅम्प परिसर असलेल्या अन्य दुसऱ्या शहरातील असू शकते.

तथापि ती अनेक व्हाट्सअप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. त्यामुळे आज न्यू गांधीनगरमध्ये एका महिलेवर मुले पळवणारी अपहरणकर्ती असल्याचा संशय घेऊन तिच्यावर हल्ला करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्या महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका केली आहे. सदर निष्पाप महिलेवर संशय घेऊन हल्ला होण्याचा प्रकार हा व्हाट्सॲपवर व्हायरल झालेल्या क्लिपमुळे घडला आहे. तेंव्हा आमची नागरिकांना विनंती आहे की अपहरणाबद्दलच्या कोणत्याही व्हाट्सॲप संदेशावर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका.

जर कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसली तर कृपया 112 क्रमांकावर संपर्क साधा. तुमच्याकडून माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन संबंधित संशयिताला ताब्यात घेण्याद्वारे पुढील कारवाई करतील असे सांगून कृपया नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शेवटी केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *