
बेळगाव : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम गाळत होते. या कामगारांनी मुंबईच्या औद्योगिक आणि नागरी विकासात मोलाचा वाटा उचलला. मात्र काळाच्या ओघात गिरण्या बंद पडल्या आणि हजारो कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. आजही त्या वेदनेची किनार बेळगावच्या गावागावांत जाणवते आहे.
१९९० साली महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेने गिरण्यांच्या जागांचा वापर वाणिज्य व निवासी प्रकल्पांसाठी करण्यास परवानगी दिल्यानंतर गिरणी मालकांना मोठा आर्थिक लाभ झाला. परंतु गिरणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन मात्र रखडलेच. श्रमिक संघटनांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना मुंबईत मोफत घरे देण्याचा निर्णय जाहीर झाला; तरीही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर १० मार्च २०२६ रोजी आझाद मैदान येथे “चला आझाद मैदान” आंदोलन पुकारण्यात आले आहे. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना मुंबईतच मोफत घरे मिळावीत, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे. याआंदोलनाच्या जनजागृतीसाठी शनिवार, ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता बोडकेनट्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काळामा देवी मंदिरात गिरणी कामगारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत श्रमिक संघटनेचे कॉम्रेड उदय भट, कॉम्रेड दत्तात्रय आत्याळकर आणि कॉम्रेड अतुल दिघे मार्गदर्शन करणार आहेत.
चलवेनहट्टी, बोडकेनट्टी, हंदिगनूर, अगसगे, अतिवाड, कुरीहाळ, कट्टनभावी, म्हाळेनहट्टी, मण्णीकीरे, बेक्कीनकेरे, किटवाड, बंबरगा, केदनूर आदी भागांतील गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनोहर हुंदरे (चलवेनहट्टी), राजू तवनोजी (बोडकेनट्टी), बाळू पाटील (हंदिगनूर), जोतिबा पाटील (चलवेनहट्टी) आणि केदारी पाटील (अतिवाड) यांनी केले आहे.
बेळगावच्या गावोगावांतून उठणारा हा आवाज आता थेट मुंबईच्या आझाद मैदानावर घुमणार आहे. गिरणी कामगारांच्या न्यायहक्कासाठी बेळगाव ते मुंबई असा संघर्षाचा धागा पुन्हा एकदा दृढ होताना दिसत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta