Saturday , March 7 2026
Breaking News

“सागरा प्राण तळमळला…” सेल्युलर जेल किरण जाधव यांची भेट!

Spread the love

 

‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा योग

‘अंदमान, निकोबार’ ही नावे ऐकताच माझ्याच कशाला, प्रत्येक मराठी माणसाच्या मनःचक्षु समोर प्रथम कोणी येत असेल तर ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल, आठवण होत असेल तर ते “काळे पाणी”, आणि जिभेवर पंक्ति येत असतील तर त्या ” जयोस्तुते…जयोस्तुते..श्री महन् मंगले, शिवास्पदे शुभदे….” हे गाणं ऐकल्यानंतर एक वेगळीच स्फुर्ती मराठी माणसाच्या अंगात संचारते आणि समोर उभा राहतो तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा तेजस्वी चेहरा.

माझ्या शालेय जीवनातच मी ‘माझी जन्मठेप’ ही स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांची रोमांचक जीवन कहाणी वाचली होती. तेव्हापासून मनात अंदमानला जाण्याची एक सुप्त इच्छा होती. ज्यांनी मातृभूमीला गुलामीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी आपले जीवनपुष्प अर्पण करण्यासाठी मागे-पुढे पाहिले नाही. घरादाराची राखरांगोळी करून केवळ मातृभूमीला मुक्त करण्यासाठी भयंकर शिक्षा भोगली त्या महान विभूती स्वा. वि. दा. सावरकरांच्या वास्तवने पुनीत झालेल्या अंदमानला अर्थातच सेल्युलर जेलला ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याचा योग आला, यासाठी मी स्वत:ला धन्य मानतो.
अलीकडेच सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी अंदमान-निकोबारला जाण्याचा योग आला.

विमान विमानतळावर उतरत असताना विमानाच्या खिडकीमधून तो अथांग निळाशार समुद्र खुणावत होता आणि पुन्हा त्याच आठवणी डोक्यात कल्लोळ करत होत्या. थोड्याच वेळात त्या पवित्र भूमीमध्ये विमान उतरलं. पवित्र यासाठी की, ती भूमी साक्षीदार होती त्या सावरकरांच्या अस्तित्वाची, अन्‌‍ सावरकर तिथे जीवंत समोर उभे दिसले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रायटनच्या समुद किनाऱ्यावर लिहिलेले `ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला` हे गीत आम्हाला लहानपणापासून आठवणीत राहिलेले. त्याचवेळी मातृभूमीच्या विरहाने व्याकुळ झालेले सावरकर डोळ्यांसमोर उभे राहिले. एकदम हृदयस्पर्शी होते ते. त्यांची मातृभूमीसाठी ती तळमळ गीतातून स्पष्ट जाणवली आणि सावरकर माझ्या जीवनात नेहमीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले.

विशाल महासागरातील त्यांच्या जगप्रसिद्ध उडीमुळे लहानपणापासूनच सावरकर अगदी जवळचे होते. आकाराने बरीच मोठी जहाजं पाहीले होती. त्याचमुळे मला प्रश्न पडत होता की, इतक्या छोट्या खिडकीमधून सावरकरांनी कशा पद्धतीने त्या महाकाय समुद्रामध्ये उडी घेतली असेल? कशी ती जहाजामधील खिडकीची काच सावरकरांनी तोडली असेल. त्यांच ते शरीर त्या छोट्या खिडकीमधून अर्धवट तुटलेली काच.. आई गं.. किती त्या वेदना.. रक्ताळलेलं शरीर आणि समुद्राचे खारट पाणी.. कल्पना करूनच मन सुन्न होते.
अलीकडेच काही दिवसांपुर्वी मित्रांसोबत अंदमान-निकोबारला जाण्याचा योग आला. येथे जाण्यासाठी आता बोटी बरोबर विमान प्रवासही सहज उपलब्ध आहेत. आम्ही विमानाने तेथ पोहोचलो. विमान आता विमानतळावर उतरणार होतं तेच विमानाच्या खिडकीमधून तो अथांग निळाशार समुद्र खुणावत होता आणि पुन्हा त्याच आठवणी डोक्यात कल्लोळ करत होत्या. थोड्याच वेळात त्या पवित्र भूमीमध्ये विमान उतरलं. पवित्र यासाठी की, ती भूमी साक्षीदार होती त्या सावरकरांच्या अस्तित्वाची, अन्‌‍ सावरकर तिथे जीवंत समोर उभे दिसले. आता आतुरता लागली होती ती त्या पुण्य स्थळाला भेट देण्याची.त्याच आतुरतेने सेल्युलर जेल पाहण्यासाठी निघालो. सेल्युलर जेलची रचना पाहता ते किती दहशत पसरवणार असेल, याची कल्पना येत होती. सेल्युलर जेल म्हणजे एक विक्राळ राक्षस वाटला. त्या राक्षसाचे दहा अंगामधले तीन अंग त्याच्या क्रूरतेची जाणीव करून देण्यास तेवढेच प्रभावकारी वाटत होते. येथील एकेका जागेची टप्प्या- टप्प्याने माहिती घेत असताना एक एक इतिहास जीवंत होत होता. इंग्रजांच्या क्रूरतेची आणि निष्ठुरतेची साक्ष असलेला तो ‘सेल्युलर जेल’ नावाचा विक्राळ राक्षस. इतिहासात इंग्रजांनी करकचून आवळेले राक्षसी फास याची कल्पनासुद्धा करणे भयावह होते.

याठिकाणी 700 कैद्यांना बंदीस्त ठेवताना त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी 23अधिकारी तैनात करण्यात आले होते. सावरकरांनी 7 × 13 आकाराच्या कोठडीत अकरा वर्षे व्यतीत केली.त्यांच्या बंधूंनी त्यांच्यासोबत येथे कारावास भोगला. सेल्युलर जेलचे अवशेष, तेलाचा घाणा, गोणी बॅगचे बनवलेले कपडे, अंधार कोठडी, कैद्यांना चाबकाचे फटके देण्यासाठी मध्यभागी असलेली मोकळी जागा, कैद्यांना फाशी देण्यासाठी असलेली जागा यासारखे अवशेष तो इतिहास जीवंत करण्यासाठी पुरेसे होते. हे इतकं पाहाता अनुभव किती भयंकर असेल याची कल्पनादेखील नाही करू शकत नाही.

क्रांतिकारक असले तरी मानवी हाडा मासाची माणसच ती. एका क्षणात मरण पत्करणं वेगळं आणि क्षणाक्षणाला मरण यातना सहन करण वेगळं.
याठिकाणी आता ‘लाईट हाऊस शो’ माध्यमातून सावरकर यांच्याबद्दल माहिती देणारा कार्यक्रम होता. त्यात त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. त्या अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगणारे इंग्रजांच्या जुलमी अत्याचारापेक्षा राक्षसी वृत्तीमध्ये तग धरून राहणारे, सगळ्या जुलमात स्वतःच स्वतःचे मानसिक हिलिंग करणारे सावरकर मला जास्त आदरणीय आणि पूजनीय वाटले.सुभाष चंद्र बोस यांनी येथेच 1943 रोजी तिरंगा फडकवला होता.

विनायक दामोदर सावरकर हे भारतीय इतिहासातील स्वातंत्रसेनानी म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अमर्त्य काव्यपंक्तींनी लाखो भारतीयांच्या हृदयात राष्ट्रवादाची वात चेतवली, या गोष्टीला 116 वर्षे झाली. त्या निमित्त आंदमान-निकोबारच्या श्री विजय पुरम येथे सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. हा पुतळा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचे, अजोड त्यागाचे आणि निडर विचारसरणीचे प्रतीक आहे. या ठिकाणी संतत तेवत ठेवण्यात आलेली ज्योत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्र प्रेमाची भावना जागृत करणारी आहे.

अंदमान निकोबार भागात एकूण 38 बेटे आहेत. या बेटांना इंग्रजांनी आपल्या परीने आपल्या पद्धतीने नावे दिली होती. मात्र आता भारत सरकारने इंग्रजांनी दिलेल्या तेथील बेटांच्या नावांचे नामांतर सुरू केले आहे. अंदमान निकोबार ला आता विजयपूरम ओळखले जात आहे.भारतीयांना पर्यटन आवडते.याकडे लक्ष दिल्यास आपल्या भावी युवा पिढीला स्वातंत्र्य सेनानींचा तेजस्वी इतिहास नेहमीच स्मरणात राहावा यासाठी विद्यार्थ्यांनी, तरुणांनी या पवित्र भूमीला नक्की भेट द्यावी.शाळा विद्यालयाच्या मंडळा बरोबरच पालकांनी आपल्या मुलांसोबत याठिकाणी भेट देऊन राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवली पाहिजे.

– किरण जाधव, नेते सकल मराठा समाज बेळगाव

About Belgaum Varta

Check Also

रयत गल्ली विहिरीत ड्रेनेज मिश्रित पाणी; जनतेचे आरोग्य धोक्यात

Spread the love  बेळगाव : ड्रेनेजचे सांडपाणी जमिनीत झिरपून रयत गल्ली, वडगाव येथील विहिरी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *