आयडीबीआय बँकेकडून ९० हजारांची देणगी; पालक सभेच्या निमित्ताने कार्यक्रम
येळ्ळूर : येथील मराठी मॉडेल शाळेत पालक सभेचे औचित्य साधून ग्रीन बोर्ड आणि तिजोरी कपाटाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. आयडीबीआय बँकेकडून सुमारे ९० हजार रुपयांच्या या साहित्याची देणगी शाळेला देण्यात आली असून या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक सुविधांमध्ये भर पडली आहे.
शनिवार दि. ७ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष जोतिबा यल्लाप्पा उडकेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयडीबीआय बँक कॉलेज रोड, बेळगावचे डीजीएम मॅनेजर चार्ल्स राजा जे., आरपीडी क्रॉस शाखेचे व्यवस्थापक अनिल नाईक, मुख्य शाखेचे एजीएम रोहित हिरामणी तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व सन्मित्र सोसायटीचे चेअरमन राजकुमार पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत सहशिक्षिका ऐश्वर्या मेणसे यांनी केले. यावेळी शाल, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी धावत्या युगात यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. शाळेचे माजी विद्यार्थी राजकुमार पाटील यांनी शाळेतील मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या दर्जेदार शिक्षणाचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात जोतिबा उडकेकर यांनी देणगीदारांचे आभार मानत शाळेच्या विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका एम. एस. मंडोळकर यांनी केले, तर आभार सहशिक्षक सातेरी पाखरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे सदस्य दिनेश लोहार, विजय धामणेकर, अलका कुंडेकर, शुभांगी मुतगेकर, रेश्मा काकतकर, राजश्री सुतार, अर्चना देसाई, ज्योती पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta