बेळगाव : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बेळगावच्या जिल्हा क्रीडा संकुलात युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागातर्फे रविवारी दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमधील आत्मविश्वास, सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक जागृती वाढवण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात महिला आणि तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिलांनी क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व उपसंचालक श्रीनिवास बी. यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर मान्यवरांचे स्वागत आणि परिचय करून देण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजिका ज्योत्स्ना पै, शांताई वृद्धाश्रमाच्या सुमन मोहिते, ‘फिट इंडिया’च्या महिला ब्रँड ॲम्बेसेडर आणि आंतरराष्ट्रीय ज्युडो पदक विजेत्या एकलव्य पुरस्कार प्राप्त गीता धनप्पगोळ तसेच आंतरराष्ट्रीय पॅरा स्विमर सिमरन गोंधळकर उपस्थित होत्या.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून महिलांना यशाचा मंत्र दिला. जिद्द, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर महिला कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकतात, असे प्रेरणादायी विचार यावेळी मांडण्यात आले. महिलांनी केवळ कुटुंबासाठीच नाही तर स्वतःच्या आरोग्यासाठी आणि सक्रिय जीवनासाठी वेळ काढला पाहिजे, असे आवाहनही मान्यवरांनी केले.
याप्रसंगी क्रीडा स्पर्धा, फिटनेस सत्र, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आणि संवादात्मक कार्यक्रम पार पडले. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पदक, चषक आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. क्रीडा विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सहभागी महिलांनी समाधान व्यक्त केले. या सोहळ्याला क्रीडा विभागाचे सर्व प्रशिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta