
मराठी भाषा गौरव दिन व जागतिक महिला दिनानिमित्त शब्दगंध कवी मंडळ संघाचा उपक्रम
बेळगाव : मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिनाच्या दुहेरी औचित्य साधत शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे आयोजित खुले कवी संमेलन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. येथील मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात भरलेल्या या काव्यमहोत्सवात मराठी भाषेचा गौरव आणि स्त्रीमनातील विविध भावछटा कवींनी आपल्या आशयघन कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त केल्या. त्यामुळे सभागृहात मराठीच्या गोडीचा आणि स्त्रीसंवेदनांच्या सामर्थ्याचा एक अनोखा जागर अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विद्यानिकेतनचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सुधाकर गावडे यांनी कुसुमाग्रजांची प्रेरणादायी “प्रेम कर” ही कविता सादर केली, तर रेखा गद्रे यांनी सावित्रीबाईंची समाजजागृतीची जाज्वल्य कविता “याला मानव म्हणावे का?” प्रभावी स्वरात सादर करून उपस्थितांना विचारप्रवृत्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी केले. त्यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि स्त्रीशक्तीच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत या कवी संमेलनाच्या उद्देशाची मांडणी केली.
या कवी संमेलनात अनेक कवींनी आपल्या हृदयस्पर्शी कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त करत गुरुनाथ किरमटे यांच्या
“अनन्य तुझ्या उपकारांचे
फेडू कसे मी पांग,
गे मातृभाषे मराठी
फक्त एवढे सांग…” या ओळींनी सभागृह भारावून गेले.
स्त्रीस्वातंत्र्याचा विचार मांडताना तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत सुधाकर गावडे यांनी
“तीला हवे ते तीने करावे
त्याला हवे ते त्याने,
मनाप्रमाणे स्वैर आपल्या
वागावे ज्याने त्याने…” अशा अर्थबोध ओळी सादर केल्या.
प्रा. महादेव खोत यांनी “बेळगावात मराठीला मान कुठे आहे हो?
अन् सांगा मराठी मर्द मावळा बाणा कुठे आहे हो?” असे म्हणत बेळगावच्या सांस्कृतिक वास्तवावर भाष्य करत त्यांनी मराठी अस्मितेचा सवाल उपस्थित केला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने सभागृहात चिंतनशील वातावरण निर्माण झाले. कवितेतील ओळींनी उपस्थितांच्या मनाला चटका लावला.
स्त्रीच्या वेदना आणि सामाजिक वास्तवाचे चित्रण करत रोशनी हुंद्रे यांच्या “गोंदण” कवितेतील
“बाईनेच गोंदवून घ्याव का गोंदन,
गोंदन तरी असत कुठं तिच्या मालकीचे…
तेही देत असत असह्य वेदना.” ओळींनी श्रोत्यांच्या मनाला स्पर्श केला.
तर उर्मिला शहा यांनी
“बाई,
तुझं जगणंच मुळी कठपुतळीचं.
दोरी तीच रहाते,
फक्त नाचवण्याचे प्रकार वेगळे असतात.” असे म्हणत स्त्रीजीवनाचे मार्मिक चित्रण केले.
“धन्य त्यांची साधना,
धन्य ते सारे साधक,
धन्य माझी माय मराठी
आणि धन्य तिचे उपासक.” मराठी भाषेचा गौरव व्यक्त करत आनंद मेणशी यांनी सादर केलेल्या या ओळींनी उपस्थितांना अभिमानाची जाणीव करून दिली.
समाजातील बदलत्या भाषिक प्रवाहांवर भाष्य करत जोतिबा नागवडेकर यांनी हलक्या-फुलक्या शैलीत म्हणाले—
“इकडे तिकडे हॅलो हाय, जाताना म्हणतात बाय बाय,
हे ऐकून पाहून तंग झालो, बिन तालाचा मृदंग झालो.”
यांच्यासह या कवी संमेलनात किरण पाटील यांनी “स्त्री जन्मा तुझी कहाणी” या कवितेतून स्त्रीजीवनातील संघर्ष आणि जिद्दीचे चित्रण केले. सौ. स्नेहल बर्डे यांनी “स्त्री तुझी रूपे” या कवितेतून स्त्रीच्या विविध रूपांचा गौरव केला. प्रा संजय बंड यांनी “लळा माय मराठीचा” या कवितेतून मायमराठीप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. प्रा. शुभदा प्रभू खानोलकर यांनी “सावित्रींच्या लेकी” हा पोवाडा सादर करून क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव केला. प्रा. मनीषा नाडगौडा यांनी “रंग स्त्रीत्वाचा” या कवितेतून स्त्रीत्वाच्या विविध छटा उलगडल्या.
अक्षता यळ्ळूरकर यांनी “दुरावलेली छकुली” या कवितेतून सामाजिक वास्तव अधोरेखित केले. डॉ. प्रेमा मेणशी यांनी “प्रिय मराठी” या कवितेतून मराठी भाषेप्रती असलेले प्रेम व्यक्त केले, तर सौ. नेहा जोशी यांनी “महिला दिन” या कवितेतून स्त्रीशक्तीचा गौरव केला. श्री. निलेश शिंदे यांनी “तीच ती स्त्री संघर्षाची रागिणी” या कवितेतून स्त्रीच्या संघर्षमय प्रवासाचे प्रभावी चित्रण केले. सीमा कणबरकर यांनी “शेतकऱ्यांची बायको” या कवितेतून ग्रामीण स्त्रीचे कष्टमय जीवन उलगडले. सौ. रेखा गद्रे यांनी “महिला दिन” या कवितेतून स्त्रीच्या स्वाभिमानाचा संदेश दिला.
परशुराम खेमणे यांनी “शब्दांनो तुम्ही माणसांना जिवंत ठेवा” या कवितेतून शब्दांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. व्ही. एस. वाळवेकर यांनी “द्रौपदीचे वस्त्र” या कवितेतून स्त्रीअवमानाच्या प्रश्नावर तीव्र भाष्य केले. बसवंत शहापूरकर यांनी “झोप आता बाई” या कवितेतून स्त्रीजीवनातील वेदना व्यक्त केल्या. कु. अनुजा लोहार यांनी “जगात भारी माझी मराठी” या कवितेतून मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला.
अस्मिता देशपांडे यांनी “मलाही अभिमान आहे मराठी असल्याचा” या कवितेतून मराठी अस्मितेचा अभिमान व्यक्त केला. श्री. मधु पाटील यांनी “मायबोली” या कवितेतून मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मयुरी जाधव यांनी “स्त्री सामर्थाची कहाणी” या कवितेतून स्त्रीच्या जिद्दीचा आणि सामर्थ्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अखेरीस प्रा. अशोक आलगोंडी यांनी सादर केलेल्या “बेळगाव अभिमान गीत” या कवितेने कार्यक्रमाचा समारोप अभिमानाच्या सुरावटीत झाला
कवींच्या ओजस्वी सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन परशुराम खेमणे यांनी केले.
मराठी भाषेच्या गौरवाची आणि स्त्रीशक्तीच्या संवेदनशील जाणिवांची सुंदर सांगड घालणारे हे खुले कवी संमेलन साहित्यरसिकांसाठी अविस्मरणीय ठरले.
Belgaum Varta Belgaum Varta