Tuesday , March 10 2026
Breaking News

पिण्याच्या पाण्यासाठी रयत गल्लीतील नागरिक आक्रमक; महापालिकेवर धडक मोर्चा

Spread the love

 

बेळगाव : वडगावमधील रयत गल्ली भागात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याच्या निषेधार्थ रयत गल्लीतील रहिवाशांनी महापालिका कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

वडगावमधील रयत गल्लीतील रहिवासी गेल्या २० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळत असल्याबाबत महापालिकेला वारंवार निवेदने देण्यात आली होती, मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर रहिवाशांनी महापालिका कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी संतप्त नागरिकांनी कार्यालयाच्या आवारातच रिकाम्या घागरी फोडून प्रशासकीय दिरंगाईचा निषेध नोंदवला.

गेल्या १५ दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उद्यापर्यंत ही समस्या न सुटल्यास संपूर्ण वडगाववासीय महापालिकेला घेराव घालतील, असा इशारा राजू मरवे यांनी दिला आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नसल्याने दैनंदिन कामांवर परिणाम होत असल्याची व्यथा आंदोलक महिलांनी मांडली. पालिकेचे पाणी येत नसल्यामुळे खासगी टँकरसाठी ८०० रुपये मोजावे लागत आहेत, मात्र अधिकारी आमच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत नसल्याची प्रतिक्रिया आंदोलक महिलांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची आणि उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर महापालिका आयुक्त कार्तिक एम. आणि अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी नागरिकांचे निवेदन स्वीकारले. हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

About Belgaum Varta

Check Also

कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात

Spread the love  बेळगाव : शिक्षणामुळे महिलांसाठी विविध क्षेत्रात असंख्य संधी उपलब्ध झाल्या असून मुलींनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *