बेळगाव : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ बेळगावात महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. महिला दिनाच्या दिवशीच दरवाढ जाहीर केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला.
बेळगाव शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने आरटीओ चौकातील काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर रिकामे गॅस सिलेंडर घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. दरवाढीमुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले असून सर्वसामान्य जनतेवर आर्थिक ताण वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी बोलताना ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या धोरणांमुळे जनतेवर आर्थिक भार वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गॅस सिलेंडरचे दर तातडीने कमी करण्यात यावेत, अन्यथा महिला काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान या आंदोलनात महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तथापि देशभरात गॅस दरवाढीचा मुद्दा चर्चेत असताना बेळगावातील हे आंदोलन काँग्रेस भवन परिसरापुरतेच मर्यादित राहिल्याने त्याबाबतही विविध स्तरांत चर्चा सुरू झाल्याचे दिसून आले.
Belgaum Varta Belgaum Varta