माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून सुपूर्द केला धनादेश; डोळ्याच्या उपचारासाठी सहकार्याचा हात
बेळगाव : फटाक्यांच्या आतषबाजीत डोळा गमावलेल्या शहापूर येथील शिवा लोहार याच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू असून समाजातील विविध घटक त्याच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. समाजसेविका माधुरी जाधव यांच्या माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून श्रीमती अनुजा बाळेकुंद्री यांनी शिवाला पुढील उपचारासाठी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. दिवंगत पती सुभाष बाळेकुंद्री यांच्या स्मरणार्थ हा धनादेश शिवा लोहार याला सुपूर्द करण्यात आला.
भारत-वेस्टइंडिज क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत शिवा लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली, शहापूर) गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याचा एक डोळा निकामी झाला असून दुसरा डोळा वाचवण्यासाठी पुढील उपचार सुरू आहेत. भारतनगर परिसरातील लंबोदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असलेला शिवा सध्या उपचार घेत असून त्याच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
यावेळी समाजसेविका माधुरी जाधव (पाटील) आणि मंडळाचे अध्यक्ष पवन धामणेकर यांनी अनुजा बाळेकुंद्री यांचे आभार मानले. यावेळी सत्यम कोनेरी, सुमित पाटील, शुभम पेवे, आकाश पाटील तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज असल्याने नागरिकांनी शक्य ते सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta