Thursday , April 30 2026
Breaking News

अंगणवाडीतील रिक्त पदे ९० दिवसांत भरण्याचे निर्देश : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Spread the love

 

बंगळूर : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये कोणतेही पद रिक्त झाल्यास ते ९० दिवसांच्या आत भरले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

प्रश्नोत्तर तासात गुर्मे सुरेश शेट्टी (कापू मतदारसंघ) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाल्या की, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

भरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. संबंधित गावातील उमेदवार उपलब्ध नसल्यास ग्रामपंचायत किंवा विभाग क्षेत्रात राहणाऱ्या उमेदवारांचाही विचार केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.

उडुपी जिल्ह्यात सध्या २६ अंगणवाडी सेविका आणि १३२ मदतनीस पदे रिक्त आहेत. त्यापैकी १६ सेविका आणि १३१ मदतनीस पदांसाठी ऑनलाइन भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जिल्हास्तरीय निवड समितीने तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे, असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

दरम्यान, आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की २०२३–२४ आणि २०२४–२५ या वर्षांसाठी ‘उद्योगिनी’ योजनेतील लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्यांत अनुदान वितरित केले जाईल.

सिद्दू सवदी (तेरदाळ मतदारसंघ) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाल्या की, लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठका उशिरा झाल्यामुळे अनुदान वितरणाला विलंब झाला. या संदर्भात समितीच्या बैठका तातडीने घेण्याच्या सूचना जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

याचदरम्यान, बंगळुरमधील बंगळूर येथील ऑस्ट्रेलीयन कॉन्सुलेट जनरल कॉन्सुल जनरल हिलरी मॅकगीची आणि उपकॉन्सुल हॅरिएट यांच्या प्रतिनिधीमंडळाने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

या वेळी कर्नाटकात महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या गृहलक्ष्मी आणि शक्ती योजनांबाबत मंत्र्यांनी प्रतिनिधीमंडळाला माहिती दिली.

About Belgaum Varta

Check Also

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीत प्रवेशाची सुवर्णसंधी

Spread the love  बेळगाव : आज बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *