बेळगाव : जिद्द, चिकाटी आणि श्रम करायची तयारी असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही चमकू शकतो. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची भिती न बाळगता मन लावून अभ्यास करुन, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, म्हणजे यश नक्की मिळेल. कारण परीक्षा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली संधी आहे, असे विचार मनगुत्ती येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित सोलापूर हायस्कूल येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष राजू शिंदे हे होते.
सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक इ. एस. मस्ती यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले तर व्ही. बी. श्रेष्ठी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर एम. एम. मंत्रेशी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रारंभी निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी हसनेकर यांनी केले तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीयुत मधाळे यांनी केले. याप्रसंगी कुंडितील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वर्षभर विविध बौद्धिक व क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पदक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील, श्रीयुत मधाळे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली तर राजू शिंदे यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
याप्रसंगी शाळा सुधारणा समितीचे सदस्य विठ्ठल शेलार, श्रीमती एस. के. सुळकडे, एस. एम. पाटील, एम. एम. मंत्रेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बी .ए. मेंडूले यांनी केले तर श्रीमती एस. एम. रवळोजी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta