Monday , March 16 2026
Breaking News

“मराठी सन्मान यात्रा” महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणारी : नंदकुमार गोरुले

Spread the love

 

मराठी सन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याला येळ्ळूर येथील महाराष्ट्र चौकातून सुरुवात

येळ्ळूर : जगाच्या इतिहासात 69 वर्षे चालणारा लढा मी आजपर्यंत पाहिला नाही, सीमा लढा हा विलक्षण असा लढा आहे, आपल्याला न्याय हक्क मिळत नसेल तर तो खेचून आणला पाहिजे. छत्रपती शिवरायांच्यामुळे मराठी अस्मिता आजही जिवंत आहे. येळ्ळूर हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र सीमावासीयांच्या सोबत आहे. सीमा भागात चार पिढ्या आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत तरीही त्यांची जिद्द दबलेली नाही. मराठी टिकवण्यासाठी पहिल्यांदा मराठी शाळांचा दर्जा सुधारायला पाहिजे. विशिष्ट भाषेवर प्रत्येकाने प्रेम केले पाहिजे. मराठी हटत नाही, मराठी स्वामिनिष्ठ आहे. मराठी कधीच मरणार नाही, मराठी ही आपली आई असून मराठी ही मुळात सन्मान घेऊनच जन्माला आली आहे. निष्ठाही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात आहे. ही मराठी सन्मान यात्रा महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे, असे विचार लेखक व दिग्दर्शक नंदकुमार गोरूले यांनी येळ्ळूर येथे मराठी सन्मान यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या सुरुवातीला काढले.

यावेळी व्यासपीठावर लेखक व दिग्दर्शक नंदकुमार गोरुले, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, वामनराव पाटील, युवा समिती सीमभागचे अध्यक्ष शुभम शेळके, खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर, ऍड. सुधीर चव्हाण, विकास कलघटगी आदी यावेळी उपस्थित होते.

स्वागत प्रकाश अष्टेकर यांनी केले, प्रास्ताविक युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना शुभम शेळके म्हणाले, शिवाजी महाराजांचा मराठीचा वारसा बुलंद करण्यासाठी या “मराठी सन्मान यात्रे”चे आयोजन करण्यात आले. मराठी भाषेचा वारसा प्रत्येकाने जपला पाहिजे. हा लढा शांततेने आणि संयमाने चालू आहे. प्रत्येक चळवळीच्या अग्रभागी असणारे गाव म्हणजे येळ्ळूर. हा लढा लढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज मनगटात घेऊन आम्ही जर लढलो तर नक्कीच विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, जाब विचारल्याशिवाय आपल्याला काहीही मिळू शकत नाही. कायदेशीर मार्गाबरोबरच रस्त्यावरची लढाई सुद्धा लढणे गरजेचे आहे. हा सीमा प्रश्न सोडवून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.
मालोजी अष्टेकर बोलताना म्हणाले, “मराठी सन्मान यात्रा” सीमा प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, नवा इतिहास घडविण्यासाठी ही जनता पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. मराठी भाषा नष्ट करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. घटनेने दिलेले अधिकार आम्हाला मिळायला पाहिजेत.

सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केले तर आभार दुधाप्पा बागेवाडी यांनी मानले.

तत्पूर्वी, मराठी सन्मान यात्रेची सुरुवात राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व सिद्देश्वर मंदिर येथे आरती करून झाली. त्यानंतर बाईक रॅली काढण्यात आली. सुळगा (येळ्ळूर), अवचार हट्टी, देवगनहट्टी, मासगौड हट्टी, कुरबर हट्टी, धामणे गावातून येळ्ळूर येथे दाखल झाली. येळ्ळूर गावातील प्रमुख गल्ल्यातून फिरून बाईक रॅलीची सभास्थळी सांगता होऊन सभेत रूपांतर झाले.

About Belgaum Varta

Check Also

दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे मदतीचा हात

Spread the love  बेळगाव : काही दिवसापूर्वी खानापूर तालुक्यातील सिंगिंनकोप येथील रहिवासी स्वाती संतोष कुंभार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *