बेळगाव : आज कृतिशील मराठा समाज आणि बँक हितचिंतकांची महत्त्वपूर्ण बैठक श्री जत्तीमठ देवस्थान येथे पार पडली. मराठा सहकारी बँकेत सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबविली नसल्याचा आरोप बैठकीत हितचिंतकांकडून करण्यात आला. या बँकेत 22 जागांची नोकर भरती प्रक्रिया संशयास्पदरित्या झाली असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.
मराठा सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेबाबत मराठा समाजात तीव्र पडसाद उमटत आहे. या नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शकता राबवावी, अशी मागणी जत्तीमठातील बैठकीत करण्यात आली आणि यासंदर्भात मराठा बँक प्रशासनाला जाब विचारण्याचे देखील सर्वानुमते ठरविण्यात आले. त्याचबरोबर बँकेत नोकरी भरती संदर्भात जाहिरात बेळगावातील प्रमुख माध्यमातून का देण्यात आली नाही असा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. सोशल मीडिया तसेच मराठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून नोकर भरती संदर्भात जाहिराती असती तर हजारो मराठा बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी संधी उपलब्ध झाली असती मात्र बँक प्रशासनाने जाणीवपूर्वक जाहिरात दिली नसल्याने कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका दत्ता जाधव यांनी व्यक्त केली. नोकर भरतीसंदर्भात जाहिरात देऊन भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडून किमान पाचशे रुपये शुल्क आकारले असते तर बँकेला मोठा आर्थिक फायदा झाला असता परंतु बँक व्यवस्थापनाने बँकेच्या हिताचा विचार केला नाही की दुर्दैवाची बाब आहे. बँकेत नोकर भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आणि यासंदर्भात बँकेच्या जनरल मॅनेजर व बँक प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
याबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी कृतिशील मराठा समाजाची दुसरी बैठक लवकरच बोलावण्यात येणार असल्याचे कृतिशील मराठा समाजाचे समन्वयक अमित देसाई यांनी सांगितले. आजवर आपण मराठा समाजाच्या हक्क अधिकाराबाबत अनेक वेळा आवाज उठवला असून मराठा समाजाच्या नोकर भरती प्रक्रियेबाबत देखील सविस्तर चर्चा करून योग्य तो तोडगा काढू, जर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली नाही तर उपोषणाला बसू असेही अमित देसाई यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला अमित देसाई, दत्ता जाधव, सुनील बाळेकुंद्री, सूर्यकांत शिंदे, किरण हुद्दार, चंद्रकांत कोंडुसकर, शेखर पाटील, श्रीधर खन्नूकर, नारायण अष्टेकर, संतोष कृष्णाचे, सुरज गवळी, सुरज कुडूचकर, सुनील बोकडे, विक्रमसिंह कदम- पाटील, राजू बिरजे, मोतेश बारदेशकर, विक्रांत मोहनगेकर, सुरेश अगसगेकर, बळवंत शिंदोळकर, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, विजय भोसले, मनोहर हलगेकर, वाय. एम. शहापूरकर यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta