माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांचे प्रतिउत्तर
बेळगांव (प्रतिनिधी) : बिजगर्णी ग्राम पंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी विरोधकांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले. बोलताना पुढे ते म्हणाले बिजगर्णी ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बेळगाव तालुक्यात प्रथमच आम्ही सुसज्ज आणि सर्व सोयियुक्त बांधलेली आहे. परंतु विकासाची कावीळ झालेल्या विरोधकांनी सदर कामात भ्रष्टाचार झाल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर आणि कन्नड दैनिकांमध्ये पसरवली. परंतु आम्ही एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही.
बिजगर्णी ग्रामपंचायत बांधण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी जिल्हा पंचायतमधून आला होता आणि महिला संजीवनी ग्रुप एन आर एल एम फंडातून 17 लाख 50 हजार निधी, 15 व्या वित्त आयोग फंडातून 20 लाख रुपये तसेच बिजगर्णी ग्रा. प संरक्षण भिंत बांधण्यासाठी 17 लाख तर एकूण संपूर्ण ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी सुमारे 75 लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला होता. हा संपूर्ण निधी आम्ही पंचायत इमारत बनवण्यासाठी खर्च केलेला आहे.
बिजगर्णी येथे ग्राम पंचायतमधून रयत भवन बांधण्यासाठी नरेगा मधून 14 लाखांचा फंड मंजूर झाला होता. त्याठिकाणी आम्ही पायाभरणी केली असून, त्याठिकाणी मटेरियल एकूण 6 लाखाचे टाकलेलं आहे. उर्वरित राहिलेलं काम आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत. त्यानंतर अखिल नामक व्यक्तीने त्या ठिकाणी रयत भवन बांधत आहोत तेथील फोटो न काढता चुकीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून पंचायतीचे नाव खराब करण्याचे आणि लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. यावर जनतेनी विश्वास न ठेवता प्रत्यक्षात ज्यांनी जो काही आरोप केला आहे. त्यांनी आवश्य ग्राम पंचायतीमध्ये येऊन माहिती घ्यावी.
बिजगर्णी येथे बास्केटबॉल ग्राउंडसाठी 8 लाख फंड, शाळेच्या आवारातील दोन ठिकाणी 14 लाखांचा फंड, स्टेडियम आणि ग्राउंड लेव्हलिंगसाठी 41 लाखांचा निधी मंजूर झाला होता आणि त्यानुसार तेथील संपूर्ण काम आम्ही पूर्ण केली आहोत.
बिजगर्णी मराठी शाळेतील स्वयंपाक खोलीसाठी 17 लाखांचा फंड एन एम आर फंडातून निधी मंजूर झाला होता याची कल्पना आम्ही एसडीएमसीलाही दिली होती. परंतु कॉन्ट्रॅक्टर तेथे कोणी काम करायला तयार नव्हते त्यासाठी मंजूर झालेला फंड लॅप्स झाला. त्यानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू आणि त्यादरम्यान किचन कट्ट्याला तडा गेला होता. धोका नको म्हणून ते किचन सप्टेंबर महिन्यामध्ये पाडवलं होतं. त्यानंतर आम्ही आमदार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे पाठपुरावा करून 22 लाखांचा फंड मंजूर करून आणलेला आहे आणि ते काम आम्ही एप्रिल, मे महिन्यामध्ये सुरू करणार आहोत.
गावातील जलजीवन मिशन या कामाचा शुभारंभ आमच्या कालावधीमध्ये झालेला नव्हता. आमच्या आधी जी पंचायत मध्ये कमिटी होती. त्यांच्या कार्यकाळात हे काम झाले आहे. त्यावेळी फिल्टर त्यांनी बसवलेलं नाही. परंतु पाणी टेस्टिंग संदर्भात आरोप करण्यात आले होते. परंतु आम्ही प्रत्येक महिन्याला पाणी टेस्टिंग करतो आणि त्याचा रिपोर्ट पण आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी आवश्य हा रिपोर्ट्स कधीही पंचायत मध्ये येऊन तपासावा. त्यानंतर गावामध्ये शौच, उलटी, जुलाब झालेला आहे असाही आरोप केला होता. आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत चार गावे येतात बिजगर्णी, कावळेवाडी, राकसकोप, यळेबैल या चारही गावांमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही. हे लोक खोटे सांगून सोशल मीडियावर व्हिडिओ पसरवून पंचायतीचे नाव खराब आणि लोकांमध्ये तेड निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांनी पंचायतीमध्ये येऊन चौकशी करावी, आम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला कधीही सहकार्य करायला तयार आहोत.
पुढे मनोहर बेळगावकर यांनी सांगितले की, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीमार्फत रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा योजना, गटारी बांधकाम, तसेच इतर मूलभूत सुविधांची अनेक विकासकामे पारदर्शक पद्धतीने करण्यात आली. यामध्ये कोणताही आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही. प्रत्येक काम शासनाच्या नियमांनुसार व ग्रामसभेच्या मंजुरीनेच करण्यात आले असून कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, काही व्यक्ती राजकीय हेतूने व वैयक्तिक द्वेषातून चुकीची माहिती पसरवत आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्व कामांचे लेखे, कागदपत्रे व खर्चाचा तपशील उपलब्ध असून आवश्यक असल्यास चौकशीसाठी ते तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. “गावाच्या विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे. जनतेचा विश्वास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणालाही शंका असल्यास त्यांनी अधिकृत कागदपत्रे तपासावीत,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
——————————————————————–
प्रतिक्रिया:
संतोष कांबळे, सदस्य
– आम्ही बिजगर्णी गावांमध्ये महालक्ष्मी यात्रा काळात पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे पोचविली आहे. त्यानंतर विविध ठिकाणी पाईपलाईन खराब झाली होती त्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी वैष्णवी ट्रेडर्स यांच्याकडून आमच्या पंचायतीच्या ठराव मांडून सर्वांच्या सहमतीने तेथील मटेरियल खरेदी करून त्यांचे बिल आम्ही पंचायत मार्फत दिले आहे. संपूर्ण बिले आमच्या पंचायतमध्ये असून जे कोणी आरोप करत आहे त्यांनी पंचायतमध्ये येऊन ती संपूर्ण बिलांची चौकशी करावी. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही.
——————————————————————–
संदीप अष्टेकर, सदस्य
– आमच्या पंचायतीमध्ये काही दिवसापूर्वी आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती. परंतु सदर माहिती ऑनलाईन उपलब्ध असून प्रत्येकाला ती सहज उपलब्ध आहे. पंचायतीमध्ये कोणती कामे झाली, कोणती कामे अपुरी आहेत ही संपूर्ण माहिती इ – ग्रामसेवा, या वेबसाईटवर जाऊन माहिती घेण्याचा अधिकार आहे. आमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. काही लोकांनी आरोप केला होता पण आमच्या पंचायत मध्ये येऊन संपूर्ण याची माहिती घ्यावी आणि चौकशी करावी आम्ही प्रत्येक गोष्टीला सहकार्य करायला तयार आहोत.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा नाईक, उपाध्यक्ष महेश पाटील, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे, संदीप अष्टेकर, सुतार मॅडम, कांबळे मॅडम, पाटील मॅडम, ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta