बेळगाव : देशातील मान्यवर साहित्य संस्था पैकी एक असलेल्या साहित्य अकादमी या संस्थेतर्फे नवी दिल्ली येथे आयोजित “फेस्टिवल ऑफ लेटर्स 2026” या वार्षिक साहित्य महोत्सवात बेळगावचे साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
“21व्या शतकात दलित साहित्य” असा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये विचार व्यक्त करण्यासाठी गायकवाड यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सुमारे 100 विविध विषयावर वेगवेगळे परिसंवाद आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये देश विदेशातून 700 हून अधिक साहित्यिक व विचारवंतांना पाचारण करण्यात आले आहे. 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या परिसंवादात “दलित साहित्य” हा परिसंवाद 1 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामध्ये अनेक विद्वान सहभागी होत आहेत प्रा. विनोद गायकवाड यांनी कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा आणि संशोधन अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून त्यांच्या साई, युगांत, युगारंभ यासारख्या कादंबऱ्या मराठीतून हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, कोकणी आणि गुजराती अशा अनेक भाषांमध्येही भाषांतरित झालेल्या आहेत. त्यासाठी अनेक पुरस्कारही लाभले आहेत. साहित्य अकादमीने डॉ. गायकवाड यांच्या साहित्याची दखल देशपातळीवर घेतली आहे हा एक मानाचा सन्मान आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सचिव पल्लवी होळकर यांनी गायकवाड यांना पत्राद्वारे कळविले असून या निवडीमुळे सीमाभागाच्या साहित्य विश्वात उत्साहाची लहर निर्माण झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta