Sunday , April 5 2026
Breaking News

सीमाप्रश्नाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी मराठी पत्रकार संघाचे जनआंदोलन

Spread the love

 

बेळगाव : दीर्घकाळ प्रलंबित असलेला कर्नाटक – महाराष्ट्र सीमावाद 2004 साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. आज 22 वर्षे झाली तरी देखील या खटल्यावर सलग सुनावणी होऊ शकली नाही. सदर सुनावणी तात्काळ आणि जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांना सीमाभागातील मराठी भाषिकांचे एक लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ काल मराठा मंदिर येथे करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर हे होते. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रगतशील लेखक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद मेणसे, खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी महापौर नागेश सातेरी, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुहास हुद्दार, सहकार्यवाह महेश काशीद, विशेष प्रतिनिधी शेखर पाटील, सदस्य शिवराज पाटील होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनाने करण्यात आले.
संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्ताविकात सीमाप्रश्नी पत्रकार संघाने दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
यावेळी बोलताना प्राध्यापक आनंद मेणसे म्हणाले की, लेखक, पत्रकार आणि चित्रकार एकत्र आल्यास समाजात बदल घडतो आणि त्यातूनच जनआंदोलन तयार होते आणि यशस्वी होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, सह्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून या खटल्याला चालना मिळू शकते कारण ज्या लोकांना न्यायाची प्रतीक्षा आहे असे लोक अशा प्रकारची सामुदायिक कृती करू शकतात. संपूर्ण सीमा भागातून एक लाख सह्या घेऊन त्याचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ऑफिस मध्ये एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून जाऊन देता येते, असे प्राध्यापक आनंद मेणसे यांनी यावेळी सांगितले.
माजी महापौर नागेश सातेरी म्हणाले, सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयात चालढकल करत आले आहे. महाराष्ट्र सरकार जागरुक नाही. महाराष्ट्राच्या तज्ज्ञ समितीतील एकही मंत्री, आमदार सीमाप्रश्नी तज्ज्ञ नाही. जयंत पाटील यांना सीमाप्रश्नाची माहिती आहे. त्यांना या समितीत असायला हवे, असे त्यांनी सांगितले.
म. ए. समिती कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लेखणी परजली. आता बेळगावातील मराठी पत्रकारांनी सह्यांच्या मोहिमेचा उपक्रम हाती घेतला आहे. घराघरांपर्यंत मराठीचा मुद्दा पोहोचवत सह्या घ्या.
खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, म. ए. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे नितीन कपिलेश्वरकर, अनिल पाटील आदींनीही मनोगत व्यक्त केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या पहिल्या सहीने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
शिवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुहास हुद्दार यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश मरगाळे, ऍड. महेश बिर्जे, आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, आर. के. पाटील, बाळासाहेब शेलार, राजाराम देसाई, युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर, राजू बिरजे, धनंजय पाटील, विकास कलघटगी, नेताजी जाधव, उमेश पाटील, मनोहर हुंदरे, मोतेश बारदेशकर, शिवाजी पाटील, ऍड. वैभव कुट्रे शिवानी पाटील, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *