
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक आज मंगळवार दिनांक ७/०४/२०२६ रोजी सायं. ५.०० वाजता साईगणेश सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहापूर महामंडळाचे अध्यक्ष श्री. नेताजी जाधव होते. यंदाचा पारंपारिक शिवजयंती उत्सव १९ रोजी असून चित्ररथ मिरवणूक २१ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. तरी हा शिवजयंती उत्सव दरवर्षी प्रमाणे उत्साहात साजरा करण्यासंदर्भात आणि विविध विषयावर विचार विनिमय करण्यासाठी सदर बैठक आयोजिण्यात आली होती.
यावेळी बोलताना अध्यक्ष नेताजी जाधव म्हणाले, बेळगावच्या पारंपारिक शिवजयंतीला १०७ वर्षाचा इतिहास असून कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून हजारो शिवभक्त या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी येत असतात. त्यासाठी आपण दरवर्षी प्रमाणे येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करूया.
यावर्षीचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला. १९ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता मध्यवर्ती शिवजयंती मंडळ आणि शहापूर शिवजयंती महामंडळ यांच्या वतीने एकत्र छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथे पूजन करण्यात येईल. तसेच २१ एप्रिल रोजी बॅ. नाथ पै चौक येथे सायंकाळी पहिल्या चित्ररथाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येईल. तसेच शहापूर, अनगोळ आणि वडगाव भागातून येणाऱ्या चित्ररथांचे स्वागत महामंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. जर शिवजयंती उत्सव मंडळांना काही अडचणी आल्यास त्यांनी शहापूर महामंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
यावेळी प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, महादेव पाटील, पी. जी. घाडी, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिरजे, रणजीत हावळानाचे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
शहापूर महामंडळाच्या वतीने श्री प्रकाश मरगळे आणि श्री अंकुश केसरकर यांचा सत्कार
कै. दीपक दळवी यांच्या निधनानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. प्रकाश मरगाळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, तर मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदावर अंकुश केसरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने दोघांचा सत्कार शहापूर महामंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी बोलताना प्रकाश मरगळे म्हणाले, ज्या विश्वासाने माझ्यावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे त्याला मी न्याय देण्याचा प्रयत्न करेन. सीमाप्रश्न सोडवण्यासंदर्भातील घडामोडींवर लक्ष केंद्रित केले असून शिवजयंतीनंतर आपण मध्यवर्तीच्या बैठकीत लढ्याची पुढील दिशा ठरवणार आहोत असे सांगितले.
अंकुश केसरकर म्हणाले की, माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला मी तडा जाऊ देणार नाही, ही अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून १०७ वर्षाची परंपरा लाभलेली शिवजयंती आपण सर्वजण मिळून भव्यदिव्य प्रमाणात साजरी करू करूया असे मत व्यक्त केले.
यावेळी बैठकीला माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अशोक चिंडक, महादेव पाटील, पी. जी. घाडी, हिरालाल चव्हाण, श्रीकांत प्रभू, श्रीधर जाधव, सचिन केळवेकर, रणजीत हवळणाचे, अभिजीत मजुकर, सुरज चव्हाण, मंगेश नागोजीचे, राजाराम सूर्यवंशी, अनिल आंबरोळे, बाबू कोले, शशिकांत सडेकर, एस. आर. चौगुले, शिवकुमार मनवाडकर, जोतिबा मासेकर आदी उपस्थित होते. प्रशांत भातकांडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta