Sunday , July 26 2026
Breaking News

चव्हाट गल्लीतील महिला पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमधील चव्हाट गल्लीत पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र टंचाई निर्माण झाली असून, वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त महिलांनी आज घागर मोर्चा काढून रस्ता रोको आंदोलन केले.

प्रशासनाने ही समस्या तातडीने न सोडवल्यास थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. बेळगावमधील चव्हाट गल्लीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, पाण्यासाठी नागरिकांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे.

चव्हाट गल्लीत पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट झाले असून अनेक नळांना पाणीच पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या ८ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असून, जो काही पुरवठा होतोय त्यात ड्रेनेजचे दूषित पाणी मिसळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यात कीडे आढळत असूनही अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. आता अधिकारी वॉर्डात आल्यास त्यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाट गल्लीतील महिलांनी दिली.२४ तास पाणी योजनेसाठी रस्ते खोदून पाईपलाईन टाकली, मात्र त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. पूर्वी दर चार दिवसांनी पाणी मिळत होते, आता सात ते आठ दिवस झाले तरी पाणी येत नसल्याने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दूषित पाण्यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने महापालिका आयुक्तांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी चव्हाट गल्लीतील महिलांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *