
महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूरच्यावतीने नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर यांच्यावतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार व बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सीमा प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक लाख सह्यांचे निवेदन देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ नुकताच श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर रामलिंगवाडी येथे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना शहर उपप्रमुख राजकुमार बोकडे होते तर व्यासपीठावर माजी नगरसेवक नेताजी जाधव, कोरे गल्लीचे माजी पंच मनोहर शहापूरकर, राजाराम मजुकर व सत्कारमूर्ती प्रकाश मरगाळे उपस्थित होते.
सर्वप्रथम चंद्रकांत पाटील व कै. दीपक दळवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर गणेश पूजन करण्यात आले. प्रास्ताविक शिवाजी हावळानाचे यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती प्रकाश मरगाळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कोरे गल्लीच्या वतीने शिवाजी हावळानाचे व रामलिंगवाडीच्या वतीने सुनील बोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नेताजी जाधव यांनी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने राबवत असलेल्या सह्यांच्या मोहिमेची माहिती दिली. सत्कारमूर्ती प्रकाश मरगाळे यांनी बोलताना सीमा प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत मराठी भाषिक जनतेने आपली एकजूट कायम ठेवावी तसेच कन्नड रक्षण वेदिकेनी मराठी वृत्तपत्रे बंद करण्याच्या धमकीचा निषेध केला. मराठी बोर्डांना काळे फसणे व मराठी भाषिकांना सीमा भागात जाणीवपूर्वक करण्यात येणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ लवकरच भव्य असा डांबर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सीमावासीय मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी समिती कार्यकर्ते बाळकृष्ण झेडे, सुरज गवळी, शुभम हंडे, राजू गावडोजी, परशराम शिंदोळकर, रवी पवार, शेखर भातकांडे, किशोर गवळी, गजानन शहापूरकर, रवी जाधव, अभिजीत मजुकर, प्रवीण शिवणगेकर, कुणाल कोचारी, धनाजी कातकर, भूषण बोकडे, उमेश भातकांडे, राहुल बोकडे, प्रवीण पाटील, रजत बोकडे, सदानंद बिर्जे, गौरेश पाटील, दीपक तुळसकर, संजय पवार, सतीश गडकरी, विनायक पवार यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. रणजित हावळानाचे यांनी शेवटी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta