
बेळगाव : बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक यंदा अधिक शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.
शिवजयंतीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मिरवणुकीत यंदा ऐतिहासिक देखावे आणि मर्दानी खेळांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. डीजे लावून हिडीस नृत्य करणाऱ्या तसेच इतर मंडळांच्या सादरीकरणात अडथळा निर्माण करणाऱ्या मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश दिला जाणार नाही. अशा मंडळांचे चित्ररथ मिरवणुकीच्या शेवटी पाठवले जातील आणि मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारी डॉल्बी सिस्टीम जप्त केली जाईल. तसेच सादरीकरणावेळी कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिले आहेत.

बेळगावच्या शिवजयंती मिरवणुकीला एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व असून हा सुंदर सोहळा पार पाडण्यासाठी कलाकार आणि कार्यकर्ते महिनाभर परिश्रम घेतात, त्यामुळे या उपक्रमाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये. मंडळांनी आपले सादरीकरण मुख्य ठिकाणी करावे आणि जिथे गर्दीचे व्यवस्थापन करणे कठीण होईल अशा ठिकाणी देखावे सादर करणे टाळावे, असे आवाहन देखील बोरसे यांनी केले.
मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेत संपवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मिरवणूक लांबल्यास दुसऱ्या दिवशी मिरवणूक मार्गावरील व्यावसायिकांना त्रास होतो, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. तसेच बंदोबस्तासाठी परगावाहून आलेल्या पोलीस कुमकचा आदर राखावा, अशी प्रतिक्रिया नारायण बरमणी यांनी व्यक्त केली.

शिवजयंती उत्सव कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक वादात न पडता केवळ शिवरायांच्या आदरार्थ एकजुटीने साजरा करण्याचा निर्धार रमाकांत कोंडुस्कर यांनी व्यक्त केला. तसेच मिरवणुकीतील शिस्त आणि सहकार्य यावर रणजीत चव्हाण पाटील यांनी जोर दिला. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या असून लाखो लोकांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा शांततेत पार पाडण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर, रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, रणजीत चव्हाण – पाटील, विकास कलघटगी, श्रीकांत कदम, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta