Monday , April 13 2026
Breaking News

शिवजयंती चित्ररथ महामंडळाकडून चित्ररथ मंडळांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार

Spread the love

 

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता शिवजयंती चित्ररथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने रविवारी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजीराजे चौक येथील जत्तीमठ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते.

या बैठकीत यंदाचा शिवजयंती उत्सव अधिक उत्साहात आणि अभूतपूर्व पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशा पद्धतीने उत्सव कसा साजरा करता येईल, यावर विविध मंडळांच्या सूचनांवर चर्चा करून काही नियम आखण्याबाबतही सहमती दर्शविण्यात आली.

अध्यक्ष सुनील जाधव यांनी सांगितले की, बेळगाव शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला आदर्श स्वरूप देण्यासाठी आणि मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे. मिरवणूक वेळेत सुरू करून वेळेतच संपवण्यावर भर देण्यात आला. तसेच कोणताही वाद निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिस्तबद्ध वातावरणात मिरवणूक पार पडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवरायांच्या चित्ररथांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून उत्कृष्ट चित्ररथ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्रसाद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि मानपत्र देण्यात येणार आहे. भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाईल. यासंदर्भातील सविस्तर सूचना लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

प्रत्येक मंडळाने आपला चित्ररथ वेळेत मिरवणूक मार्गावर आणावा, व्यसनांपासून दूर राहावे आणि इतर चित्ररथांचा मान राखत कोणताही संघर्ष टाळावा, असे आवाहन करण्यात आले. प्रशासनाकडून मदत कक्ष उभारण्यात येणार असून, मंडळांनी आपल्या अडचणींचे निराकरण त्यामार्फत करून घ्यावे, असेही सांगण्यात आले.

बेळगावातील शिवजयंतीला विशेष परंपरा असून, देशात इतरत्र होणाऱ्या शिवजयंती उत्सवापेक्षा मोठ्या प्रमाणात बेळगावचा शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनदर्शन सादर केले जाते. त्यामुळे सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने व इतर शिवजयंती चित्ररताना सन्मान देत कार्यक्रम यशस्वी करावा, असे मत साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच शिवप्रेमींनी उत्सवाचे गांभीर्य राखत पोशाख आणि वर्तनातही सभ्यता ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.

शिवजयंती चित्ररथ महामंडळाचा मुख्य उद्देश उत्कृष्ट देखावे सादर व्हावेत आणि ते पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, हा आहे. यासाठी सर्व मंडळांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, साहित्यिक गुणवंत पाटील, प्रसाद मोरे, रणजीत हवळणाचे, चेतन किल्लेकर, शिवम गंधवाले, अरुण पाटील, चंद्रकांत माळी, अनंत बामणे, बसवंत मुतकेकर यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा बीम्स रुग्णालयात मृत्यू

Spread the love  बेळगाव : तुरमरी येथील एका गर्भवती महिलेसह नवजात शिशूचा मृत्यू बेळगावमधील बीम्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *