बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया दिली असून प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे.
ते म्हणाले मुख्यमंत्री, पंतप्रधान, नेते यासंदर्भात निर्णय घेतील. मंत्री सुधाकर आणि गोविंद कारजोळ यांच्यावर बेंगळूरमधील ठेकेदार केम्पय्या यांनी केलेल्या विधानासंदर्भात प्रतिक्रिया देताना कत्ती म्हणाले, उद्या माझ्यासह अनेकांची नवे घेऊन असे प्रकार होतील, आरोप करणारे असे अनेक आहेत. परंतु प्रकरणाची चौकशी आणि तपास पूर्ण झाल्यानंतर अहवाल येईल. या अहवालानुसार निर्णय आणि कारवाई करण्यात येईल, असे कत्ती म्हणाले.
मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांना काँग्रेस नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांसह काँग्रेस पक्षाला कोणतेही काम नसल्याने अशा पद्धतीची कामे ते करत असल्याची टीका त्यांनी केली. सरकारवर आरोप करण्यात येतातच. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर दोषी आढळल्यास कारवाई नक्की करण्यात येईल आणि दोष आढळून आला नाही तर जनताच काँग्रेसवर कारवाई करेल, असे कत्ती म्हणाले.
